साताऱ्यात एकाच दिवसात ५८ कोरोनारुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 02:27 AM2021-05-06T02:27:41+5:302021-05-06T02:28:05+5:30
जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. सातारा शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित अजूनही आढळत आहेत. त्याखालोखाल कऱ्हाड तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या मोठी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवसांत ५८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर २३७६ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता दोन हजार ७०० इतकी झाल्याने जिल्हावासीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. सातारा शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित अजूनही आढळत आहेत. त्याखालोखाल कऱ्हाड तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या मोठी आहे. मृत्यूमध्ये सातारा आणि कऱ्हाड हे तालुके सर्वांत पुढे आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण कमी यायला मार्ग नाही. बुधवारी सातारा तालुक्यात ४०९ इतके सर्वाधिक रुग्ण आढळले, तर त्याखालोखाल कऱ्हाड तालुक्यामध्ये ३१० रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये एक लाख १४ हजार २४२ रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत.
जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचे मृत्यू रोखण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. बुधवारी ५८ रुग्णांना प्राण गमवावा लागला आहे. मृत्यूचे प्रमाण कऱ्हाड आणि सातारा तालुक्यांत जास्त आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता असल्याने बाधितांसोबत त्यांच्या नातेवाइकांची पळापळ सुरूच आहे.
अहमदनगर : दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक
अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा बुधवारी उच्चांक झाला. २४ तासांत तब्बल ४,४७५ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. गत आठवड्यात हीच रुग्णसंख्या चार हजार दोनशेपर्यंत गेली होती. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील दैनंदिन रुग्णसंख्या प्रथमच विक्रमी झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने चिंता व्यक्त केली आहे.
सध्या जिल्ह्यात दररोज ३ हजार ते ३ हजार ५०० कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र १ मे रोजी प्रथमच कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या ४ हजार २१९ इतकी झाली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रुग्णांची संख्या निम्म्यावर घटली होती.
मात्र बुधवारी रुग्णात वाढ झाली असून तो मार्च २०२० पासून ते आतापर्यंतचा दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक ठरला आहे. जिल्ह्यात बुधवारी ३,१०३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्णसंख्या वाढल्याने सध्या सक्रिय रुग्णांची संख्याही २५ हजार पार गेली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या आता १ लाख ९३ हजार ६४२ इतकी झाली आहे.