बॅंकेत बनावट सोने तारण ठेवून घेतले सहा लाख कर्ज
By दत्ता यादव | Published: July 11, 2023 09:22 PM2023-07-11T21:22:35+5:302023-07-11T21:22:44+5:30
मलवडीतील घटना; सराफासह चाैघांवर फसवणुकीचा गुन्हा
सातारा : मलवडी, ता. माण येथील बँक ऑफ बडोदा शाखेमध्ये बनावट सोने तारण ठेवून बॅंकेची ६ लाख ८९ हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले असनू, याप्रकरणी एका सराफासह चाैघांवर दहिवडी पोलिस ठाण्यात फसवुणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भैरू भगवान पाटोळे, विद्या भैरू पाटोळे (रा. निढळ, ता. खटाव), ज्ञानेश्वर जगन्नाथ जाधव (रा. तोंडले, ता. माण, जि. सातारा), सराफ व्यावसायिक विजय गोरख कुंभार (रा. मलवडी, ता. माण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मलवडी येथे बँक ऑफ बडोदाची शाखा आहे. या शाखेमध्ये वरील संशयितांनी १४ सोन्याच्या पाटल्या, चार चेन अशा प्रकारचे दागिने तारण ठेवून त्याबदल्यात ६ लाख ८९ हजार रुपये कर्ज घेतले. हे दागिने बॅंकेत तारण ठेवण्यासाठी लागणारे मूल्यांकन प्रमाणपत्र सराफाने दिल्याने दागिने खरे असल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांना वाटले.
मात्र, कर्ज मुदतीत न भरल्यामुळे बॅंकेने संशयितांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची पुन्हा एकदा खातरजमा केली असता ते दागिने बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर बॅंकेचे मॅनेजर सागर आप्पासो भोसले (वय ३०, रा. दहिवडी, ता. माण) यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी सराफासह चाैघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणातील कोणालाही अटक झाली नव्हती. पोलिस उपनिरीक्षक जी. एस. दोलताडे हे अधिक तपास करीत आहेत.