६0 हौदांचा शोध सुरू
By admin | Published: July 10, 2014 12:24 AM2014-07-10T00:24:30+5:302014-07-10T00:28:02+5:30
गणेशमूर्ती विसर्जन : सातारा पालिकेतर्फे मोहिमेस प्रारंभ
सातारा : शहरात ६0 ऐतिहासिक हौद असल्याची नोंद पालिकादफ्तरी आहे. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनातर्फे या ६0 हौदांचा शोध घेतला जाणार आहे. यापैकी बहुतांश हौद आजही पाहायला मिळतात. मात्र, काही हौदांचे अस्तित्व संपले असण्याची शक्यता आहे.
पारंपरिकरीत्या शहरातील तळ्यांत गणेशमूर्ती विसर्जन केले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मूर्ती तयार करताना घातक रसायनांचा तसेच रंगांचा वापर केला जाऊ लागल्याने तळ्यांतील पाणी दूषित होऊन तळ्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने आवाज उठविला. येथील मंगळवार तळे परिसरातील नागरिकांच्या व्यथा मांडल्या. या चळवळीत अनेकांनी पुढाकार घेतला आहे. पर्यावरणप्रेमींनी तर या चळवळीचे उत्साहाने स्वागत केले. अनेक जण या चळवळीत हिरीरीने सहभागी झाले.
शाडूच्या मूर्ती बसविण्याचा आग्रह पालिकेतर्फेही धरण्यात आला आहे. शहर हद्दीत प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक यांनी दिला आहे.
‘लोकमत’ने तळ्यातील पाणी दूषित होऊ नये, यासाठी पालिकेला पर्यायही सुचविले. त्यानुसार पालिकेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. शहरातील ऐतिहासिक हौदांची स्वच्छता करून त्यात गणेशमूर्ती विसर्जनाचा पर्याय ‘लोकमत’ने सुचविला. त्यानुसार पालिका प्रशासनाने शहरातील हौदांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे.
शहरात असे ६0 हौद अस्तित्वात असल्याची आकडेवारी पालिकेच्या स्थावर जिंदगी विभागातून मिळाली. यापैकी अनेक हौद आजही अस्तित्व टिकवून आहेत. (लोकमत टीम)