‘स्थायी’च्या सभेत ६२ विषय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:39 AM2021-03-20T04:39:42+5:302021-03-20T04:39:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा पालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी सकाळी ११ वाजता कमिटी हॉलमध्ये पार पडली. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा पालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी सकाळी ११ वाजता कमिटी हॉलमध्ये पार पडली. या सभेत ६३ पैकी ६२ विषय सर्वानुमते व अवघ्या पंधराच मिनिटांत मंजूर करण्यात आले.
नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह सर्व विषय समिती सभापती उपस्थित होते. अजेंड्यावर दर मंजुरीचे ६३ विषय घेण्यात आले होते. सभा सचिवांनी विषयांची तपशीलवार माहिती दिली. काही विषयांवर सभापतींनी आपली मते नोंदविली. अवघ्या पंधरा मिनिटात सभा आटोपती घेत ६३ पैकी ६२ विषय मंजूर करण्यात आले.
पॉवरहाऊस ते माची पेठ येथे पाच दशलक्ष लिटरची टाकी व गुरुत्व नलिका बसविणे, मंगळवार पेठ धस कॉलनी येथे संरक्षक भिंत बांधणे, पालिकेतील विविध विभागांसाठी सात संगणक संच खरेदी करणे, नगरपालिका कार्यालयात लॅन केबल बसविणे, आरोग्य मुकादमांना खाकी कापड खरेदी करणे, शिवाजी उदय मंडळास क्रीडा साहित्य खरेदी करून देणे, आरोग्य विभागात १० फॉगिंग मशीन व निर्जंतुकीकरणासाठी १० हातपंप खरेदी करणे, सैनिकी मुलांच्या वसतिगृहात सोलर प्रणाली पुरविणे, जम्बो कोरोना सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करणे आदी विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पालिकेच्या विविध योजनांची माहिती देणे, जनजागृती करणे याकामी आलेल्या निविदांमध्ये दराची तफावत असल्याने आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे हा विषय तहकूब करण्यात आला.