जिल्ह्यातील ६५ हजार बाधितांत सातारा, कऱ्हाडमधील २७ हजार..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:39 AM2021-03-31T04:39:50+5:302021-03-31T04:39:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला वर्ष झाले असून, आतापर्यंत जवळपास ६५ हजार रुग्ण आढळून आले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला वर्ष झाले असून, आतापर्यंत जवळपास ६५ हजार रुग्ण आढळून आले आहेत. यामधील सर्वाधिक १५ हजारांवर रुग्णांची नोंद ही सातारा तालुक्यात आहे. तसेच कोरोना बळींचा आकडाही साताऱ्यातच अधिक आहे, तर दोन्हीबाबत कऱ्हाड दुसऱ्या स्थानावर आहे. सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यांत २७ हजारांवर बाधित नोंद झाले असून, महाबळेश्वर तालुक्यात सर्वांत कमी प्रमाण आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत रुग्ण सापडत होते. मात्र, जून महिन्यानंतर कोरोना रुग्णवाढीचा वेग झपाट्याने वाढला. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत तर दररोज कोरोनाचे रुग्ण ५०० ते ८००, ९०० दरम्यान वाढत होते. एका दिवसात हजार रुग्ण नोंद झाल्याचेही दिसून आले; पण ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर कोरोना वाढीचा वेग काहीसा मंदावला. कधी १००, २००, फार तर ३०० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळून आले. जानेवारी महिन्यापर्यंत तरी १०० च्याही खाली रुग्ण आढळून येत होते. तरीहीे बाधितांचा आकडा वाढतच चालला होता. मात्र, फेब्रुवारीपासून कोरोना बाधितांचा आकडा सतत वाढत गेला. मार्च महिना सुरू झाल्यापासून तर १००, २००, ३०० च्या पटीत बाधित सापडू लागले. त्यामुळे बाधितांचा आकडा ६५ हजारांवर पोहोचला आहे.
सध्य:स्थितीत जिल्ह्यात ६५ हजार १५३ रुग्णांची नोंद झाली आहे. यामधील १५ हजारांवर कोरोना रुग्ण हे एका सातारा तालुक्यात नोंद झालेले आहेत, तर यानंतर कऱ्हाड तालुक्यातील बाधितांची संख्या १२ हजारांजवळ पोहोचली आहे. इतर तालुक्यांतही कोरोना रुग्णांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, यामध्ये महाबळेश्वर तालुका पाठीमागे असून, यामुळे प्रशासनाला दिलासा आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तसेच मृतांची संख्याही वाढत चालली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने एक हजार ९०३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद ही सातारा तालुक्यातच झालेली आहे. यानंतर कऱ्हाड तालुक्याचा क्रमांक लागतो. यामुळे सातारा आणि कऱ्हाड हे तालुकेच हॉटस्पॉट ठरत असल्याचे दिसून येत आहे.
चौकट :
तालुकानिहाय नोंद कोरोना आकडेवारी
तालुका बाधित मृत
सातारा - १५४३२ ४७७
कऱ्हाड - ११६७४ ३५१
फलटण - ७१०१ १६८
कोरेगाव - ५७०१ १६८
वाई - ४५८४ १५३
खटाव - ४९६८ १५८
खंडाळा - ४०५० ७४
जावळी - ३०६० ६९
माण - ३५४५ १२४
पाटण - २४७२ १२०
महाबळेश्वर - १५९८ २६
जिल्ह्याबाहेरील ८०४ ...
.....................................................