जिल्ह्यात ६६८ संस्थात्मक विलगीकरण केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:15+5:302021-06-02T04:29:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील गृहविलगीकरण ...

668 Institutional Separation Centers in the district | जिल्ह्यात ६६८ संस्थात्मक विलगीकरण केंद्रे

जिल्ह्यात ६६८ संस्थात्मक विलगीकरण केंद्रे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील गृहविलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरण सुरू केले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ६६८ नवीन संस्थात्मक विलगीकरण केंद्रे सुरू करण्यासाठी तयारी केली आहे. अनेक गावांमध्ये विलगीकरण केंद्रे तयार झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले, सातारा जिल्ह्यातील १४९६ गावांपैकी ४६४ ग्रामपंचायती पूर्णपणे कोरोनामुक्त आहेत. या गावांमध्ये संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष उपाय योजना जिल्हा प्रशासन राबवत आहे. रुग्णालयाच्या आवारात असणारी लसीकरण केंद्रे आता बंद करण्यात येणार असून, इतरत्र सुरू करण्यात येणार आहेत,

जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याच्या अनुषंगाने वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत. ऑक्सिजन निर्मिती करण्यासोबतच ज्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा केला आहे, त्यांचे ऑडिट करण्यावर प्रशासनाने भर दिलेला आहे. संभावित तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले मोठ्या प्रमाणावर बाधित होतील, असा अंदाज शासनाने व्यक्त केला असल्याने रुग्णालयांमध्ये लहान मुलांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र आठ वॉर्ड राखीव ठेवलेले आहेत.

दरम्यान, लसीकरण मोहिमेची तयारीदेखील आपण चांगल्या पद्धतीने केली आहे. या महिन्यात जिल्ह्यासाठी ३८ हजार इतक्या लस उपलब्ध झाल्या होत्या. लसींचा पुरवठा चांगल्या पद्धतीने सुरू राहिला तर लसीकरण मोहीमदेखील चांगल्या पद्धतीने राबविता येणार आहे.

जे लोक तपासणीनंतर कोरोनाबाधित आढळत आहेत, अशा लोकांच्या हातावर विलगीकरणाचे शिक्के मारणे बंद झाले आहे. असे बाधित रुग्ण लोकांमध्ये मिसळत असल्याने संसर्ग वाढत असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर जिल्हाधिकारी म्हणाले, ग्रामीण भागामध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला. जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष या भागामध्ये दिले. संस्थापक विलगीकरण केल्यानंतर हा प्रश्न राहणार नाही. मात्र, शहरामध्ये नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. जे बाधित आढळतील, त्यांच्या हातावर विलगीकरणाचे शिक्केदेखील मारले जातील तसेच शहरांमध्ये सुद्धा नवीन आयसोलेशन कक्ष उभारणीच्या अनुषंगाने प्रशासन प्रयत्न करीत आहे.

चौकट..

कुटुंब प्रमुख गमावलेल्या लोकांना वीस हजारांची मदत

तुमच्या घरातील कुटुंब प्रमुखाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा कुटुंबांना शासनातर्फे २० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. अशा कुटुंबांची माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

पालक गमावलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणार

दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना शासनातर्फे मदत दिली जाणार आहे. जिल्ह्याच्या पातळीवर आपण विशेष निर्णय घेऊन तरी एक पालक कोरोनामुळे मृत्युमुखी पडला असेल तरी त्याच्या पाल्याला ११०० रुपये दिले जातील. याची माहिती घेण्याचे काम जिल्हा परिषदेतर्फे सुरू आहे.

रुग्णांनी दोन तपासण्या करू नयेत..

रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये जर रुग्ण बाधित आढळला, तर त्या रुग्णांनी आरटीपीसीआर तपासणी करण्याची गरज नाही. रॅपिड अँटिजन टेस्ट प्रभावी आहे. एका रुग्णाने दोन तपासण्या केल्यानंतर देखील रुग्णसंख्या वाढलेली दिसते, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

Web Title: 668 Institutional Separation Centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.