जिल्ह्यातील ६७ डॉक्टरांवरील निलंबन रद्द
By admin | Published: November 21, 2014 09:07 PM2014-11-21T21:07:29+5:302014-11-22T00:20:04+5:30
. निलंबित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन अन्यायकारक निलंबन मागे घेण्याची विनंती केली होती.
सातारा : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी तत्त्वावर सेवेत असलेल्या राज्यातील सहाशे व सातारा जिल्ह्यातील ६७ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आघाडी शासनाच्या काळात राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ‘मॅग्मो’ संघटनेने पुकारलेल्या संपात दबावापोटी सहभागी व्हावे लागल्याने या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. निलंबित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन अन्यायकारक निलंबन मागे घेण्याची विनंती केली होती. तरीही त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले नव्हते. अखेर या अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या अन्यायकारक कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटून अन्यायकारक निलंबन मागे घेण्यास विनंती केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी निलंबन रद्द केले, अशी माहिती डॉ. विक्रांत देशमुख, डॉ. किरण जाधव, डॉ. विजय लोखंडे, डॉ. सम्राट भादुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
दरम्यान, या अन्यायकारक कारवाई विरोधात राज्यातील ४२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. बुधवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनुप मेहता व न्यायमूर्ती जामदार खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत राज्य शासनाने समन्वयाची भूमिला घेतल्याने अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना सेवेत समावून घेण्याचे आदेश दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने अॅड. शेखर जगताप आणि अॅड. गायत्री सिंग यांनी कामकाज
पाहिले. (प्रतिनिधी)
पाच महिने काम ठप्प
मॅग्मो संघटनेच्या संपामुळे अन्यायकारकरीत्या निलंबित झालेले कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी आहे. सातारा जिल्ह्यातील साठ डॉक्टरांवर कारवाई झाली होती. परिणामी जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ऐंशी हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली तर अंगणवाड्यांतील एक लाख साठ लाख लाभार्थी तपासणीपासून वंचित राहिले. मुख्यमंत्र्यांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे हे निलंबन मागे घेतल्याने वरील जनतेला विशेष फायदा होणार आहे. तर मुख्यमंत्र्यांनी आपण कायम तुमच्यासोबत राहू, असे आश्वासन यावेळी दिले असल्याचे डॉ. विक्रांत देशमुख यांनी सांगितले.