स्वेच्छानिवृत्तीसाठी राज्यभरातून ६७ डॉक्टर वेटिंगवर !

By admin | Published: February 22, 2017 10:54 PM2017-02-22T22:54:05+5:302017-02-22T22:54:05+5:30

शासकीय रुग्णालयाची स्थिती : वाढता ताणतणाव अन् अपुरे मनुष्यबळ कारणीभूत : मुलाखतीसाठी कोणी फिरकेना

67 doctors waiting for voluntary retirement! | स्वेच्छानिवृत्तीसाठी राज्यभरातून ६७ डॉक्टर वेटिंगवर !

स्वेच्छानिवृत्तीसाठी राज्यभरातून ६७ डॉक्टर वेटिंगवर !

Next



दत्ता यादव ल्ल सातारा
राज्यभरातील शासकीय रुग्णालयातील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, क्लास वन आणि क्लास टूचे जवळपास ७६ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी शासनाकडे अर्ज केले आहेत. वाढता ताणतणाव आणि रुग्णालयात असलेले अपुरे मनुष्यबळ तसेच खासगी प्रॅक्टीस करण्यास शासनाने केलेली मनाई यामुळे शासकीय रुग्णालयात काम करण्याची मानसिकता कमी होत असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून काढला जात आहे.
एकीकडे शासकीय नोकरी मिळण्यासाठी आटापिटा केल्याचे पाहायला आणि ऐकायलाही मिळते. असे असताना मात्र शासकीय नोकरीला कंटाळा आल्याचे कोणी म्हटले तर आजच्या घडीला कोणी मान्य करणार नाही. मात्र, हे वास्तव राज्यभरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळत आहे.
खासगी दवाखान्यामध्ये भरमसाठ घेतल्या जाणाऱ्या फीमुळे सर्वसामान्य लोकांचा ओढा शासकीय रुग्णालयाकडे वाढला आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. त्यातच डॉक्टरांचे अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे रात्रंदिवस त्यांना ड्यूटी करावी लागते. ड्यूटीच्या मानाने डॉक्टरांना सोयी-सुविधा नाहीत. एवढेच नव्हे तर खासगी प्रॅक्टीस करण्यास शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण सिव्हिलला कायमचा रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत.
राज्यभरातून जवळपास ७६ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी शासनाकडे अर्ज केले आहेत. मात्र, अद्याप यावर शासनाकडून कोणतेच उत्तर मिळाले नसल्याचे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वीस वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासनाकडून पेन्शन सुरू होते. त्यामुळे ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची ही सेवा पूर्ण झाली आहे. अशाच डॉक्टरांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी शासनाकडे अर्ज केले आहेत. नवीन डॉक्टरही सिव्हिलमध्ये नोकरी करण्यासाठी पुढे येईनात. इतकी उदासीनता सिव्हिलच्या बाबतीत दिसून येत आहे. सिव्हिल प्रशासनाकडून नवीन येणाऱ्या डॉक्टरांना चक्क लाखाच्या पगाराची आॅफर दिली जात आहे. परंतु तरीही कोणी सिव्हिलची नोकरी करण्यास इच्छुक नाही.
सध्या रुग्णालयामध्ये शिकाऊ डॉक्टरांकडूनच रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अशामुळे भविष्यात सिव्हिलची अवस्था दयनीय होईल, अशाही सुरात वैद्यकीय अधिकारी बोलून दाखवितात.

Web Title: 67 doctors waiting for voluntary retirement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.