६७० सातारकर वाहनधारकांनी ना नियम पाळला ना दंड भरला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:58+5:302021-02-16T04:39:58+5:30
सातारा : अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी वाहनधारक नियम पाळतात की नाही, याची पडताळणी पोलीस करत असतात. ई-चालान मशीन आल्यापासून ...
सातारा : अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी वाहनधारक नियम पाळतात की नाही, याची पडताळणी पोलीस करत असतात. ई-चालान मशीन आल्यापासून दंडाची रक्कम जागच्या जागी भरण्यास सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण तत्काळ दंड भरत नाहीत. वर्षभरात अशा ६७० सातारकरांनी ना नियम पाळला ना दंड भरला असल्याचे समोर आले आहे.
शहर वाहतूक शाखेतर्फे सर्वाधिक कारवाया या विनापरवाना वाहन चालविणे, सीट बेल्टचा वापर न करणे, नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करून वाहतुकीस आडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ३८ वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १७ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, ज्यांनी दंड भरला नाही, अशा वाहनधारकांना सुरुवातीला नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत त्यांनी थकीत दंड भरला नाही तर त्यांचा परवाना निलंबित करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट : सहा जणांचा परवाना रद्द होणार
वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही त्याचा दंड न भरणाऱ्या तसेच वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा जणांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची शिफारस वाहतूक शाखेकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात आली आहे. २०१९ मध्ये १६ जणांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
कोट : ई-चालान मशीनचा थकीत असलेला दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जे दंड भरणार नाहीत, अशा लोकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे.
विठ्ठल शेलार, वाहतूक शाखा, सातारा
चौकट : अशी आहे आकडेवारी
नो पार्किंग १७४१
९२४१
धोकादायक वाहन १४३
३२३
ट्रीपल सीट १३४
१२०३
विनापरवाना १६५२
२९४७
मोबाइलवर बोलणे २४१
१२३५
चौकट : २०२०
कारवाई
९४५२
दंड
८५८३२