साताऱ्यातील शेतकऱ्यांसह प्रशासनाला दिलासा, आठवड्यात केवळ 'इतक्या' जनावरांना लम्पीची लागण
By नितीन काळेल | Published: January 23, 2023 06:48 PM2023-01-23T18:48:35+5:302023-01-23T18:49:01+5:30
सातारा : जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचे संकट कमी होत असून आठवड्यात फक्त ६८ पशुधनाला आजाराने गाठले. तर २१ जनावरांचा मृत्यू ...
सातारा : जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचे संकट कमी होत असून आठवड्यात फक्त ६८ पशुधनाला आजाराने गाठले. तर २१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे तीन महिन्यानंतरच शेतकऱ्यांसह प्रशासनाला दिलासा मिळालाय. तर आतापर्यंत जिल्ह्यातील २० हजार पशुधन बाधित झाले असून १ हजार ४३६ चा बळी गेला आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून लम्पी चर्मरोगाचा शिरकाव झाला. कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी गावात प्रथम लम्पी बाधित पशुधन आढळले होते. त्यानंतर लम्पीचा प्रसार जिल्ह्यात वाढला. पशुसंवर्धन विभागाने लम्पी संकटापासून जनावरांना वाचविण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली. नोव्हेंबर महिन्यातच जिल्ह्यातील ३ लाख ५४ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले होते. त्यामुळे त्यानंतर लम्पीने बाधित होणाऱ्या जनावरांचा आकडा कमी होत गेला.
जिल्ह्यातील २२९ गावांत आतापर्यंत लम्पी बाधित जनावरे आढळून आलेली आहेत. तर २० हजार १८० पशुधन बाधित झाले. त्यातील १ हजार ३६ जनावरे मृत झाली आहेत. सद्यस्थितीत दोन हजार पशुधनावर अजून उपचार सुरु आहेत. तरीही जिल्ह्यातील लम्पीचे संकट कमी झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
फलटण तालुका आघाडीवर...
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात लम्पी बाधित पशुधन आहे. यामध्ये फलटण तालुक्यात सर्वाधिक होते, तर महाबळेश्वरला कमी राहिले. फलटणमधील ५ हजार ८२५ जनावरे आतापर्यंत बाधित झाली. तर ४०६ जनावरांची बळी गेला आहे.