७ जनावरांचा मृत्यू: वीज पडून एक शेतकरीही ठार; शेतीचे कोटीत नुकसान

By नितीन काळेल | Published: April 19, 2023 07:45 PM2023-04-19T19:45:08+5:302023-04-19T19:45:15+5:30

वळवाने २१ कुटुंबांना केले बेघर..

7 animals killed: One farmer also killed by lightning; Loss of agriculture in crores | ७ जनावरांचा मृत्यू: वीज पडून एक शेतकरीही ठार; शेतीचे कोटीत नुकसान

७ जनावरांचा मृत्यू: वीज पडून एक शेतकरीही ठार; शेतीचे कोटीत नुकसान

googlenewsNext

सातारा : जिल्ह्यात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून सतत जोरदार वाऱ्यासह वळवाचा पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेती पिके आणि फळबागांचे कोटीत नुकसान झाले. गेल्या १० दिवसांत तर जिल्ह्यातील २१ कुटुंबांना वळवाने बेघर केले. तसेच ७ जनावरांचा मृत्यू झाला असून वीज पडून एक शेतकरीही ठार झाला आहे.

जिल्ह्यात दरवर्षीच जानेवारी महिन्यानंतर अवकाळी आणि वळवाचा पाऊस पडतो. यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यावर अवकाळी पाऊस पडला. याचा फटका तीन तालुक्यातील शेतीला फटका बसला. यामध्ये ८५ लाख ७३ हजार रुपयांचे पीक आणि बागांचे नुकसान झालेले. यातून बळीराजा सावरत असतानाच एप्रिल महिन्यात वळवाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मागील ११ दिवसांत तर ८ वेळा जोरदार वाऱ्यासह वळीव जिल्ह्यात कोठे ना कोठे बरसला आहे. त्यातच गारपीट होत आहे. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होत आहे. तर वाऱ्यामुळे घरे, शाळांवरील पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या. तसेच वीज पडूनही नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात ८ एप्रिलपासून आतापर्यंत वळवाच्या पावसाने २१ घरांची पडझड झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील सर्वाधिक १० घरांचा समावेश आहे. तर वाई तालुक्यात ७, फलटण आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी दोन घरे बाधित झाली आहेत. त्याचबरोबर लहान ३ आणि मोठ्या चार जनावरांचा मृत्यू झालाय. यातील ५ जनावरांचा खटाव तालुक्यात तर वाई आणि फलटण तालुक्यात प्रत्येकी एक पशुधन दगावले आहे. त्याचबरोबर जावळी तालुक्यात पावसामुळे ७ कोंबड्यांचाही मृत्यू झालाय. तर कोरेगाव तालुक्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
यावर्षी अवकाळीपेक्षा आताच्या वळवाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. यामध्ये पिके, फळबागा आणि पशुधनाचाही समावेश आहे. आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदत लवकर द्यावी, अशी मागणी केली आहे.

वळवात फळबागांचेच अधिक नुकसान...
जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस होऊन दीड हजार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. यामध्ये रब्बी हंगामातील पिकांचा समावेश अधिक होता. कारण, त्याचवेळी शेतकऱ्यांची पीक काढणी आणि मळणी सुरु होती. त्यामुळे बाधित शेतकरी अधिक आणि नुकसान कमी राहिले. पण, आता वळवात पिकांपेक्षा फळबागांचे नुकसान अधिक झाले आहे. फळबागांचे नुकसान अधिक राहते. तसेच शासनाकडून मदतही पिकांपेक्षा जादा मिळत असते.

Web Title: 7 animals killed: One farmer also killed by lightning; Loss of agriculture in crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.