पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून दोन रस्त्यांसाठी ७ कोटी १५ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:39 AM2021-04-18T04:39:20+5:302021-04-18T04:39:20+5:30
कराड खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीने केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून कराड तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी ७ कोटी १५ ...
कराड
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीने केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून कराड तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी ७ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यांच्या शिफारशीने सातारा लोकसभा मतदारसंघातील एकूण ३७ रस्त्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार मसूर ते निगडी या ६.९७ कि.मी. रस्त्यासाठी ४ कोटी ४० लाख ८३ हजार रुपये व मनू-उंडाळे ते तुळसण या ४.१९ कि.मी. रस्त्यासाठी २ कोटी ७५ लाख ९९ हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची सुरुवात २५ डिसेंबर २००० साली झाली होती. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील ५०० च्या वर लोकसंख्या असणारी गावे मुख्य रस्त्यास जोडणे हा होता. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून तत्कालीन कराड लोकसभा मतदारसंघातील वाडीवस्तीवर या योजनेखाली मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात यश मिळाले होते.
सध्याच्या योजनेत ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल यांना जोडणारे जे रस्ते आहेत अशा रस्त्यांना गुणांकन देऊन प्राधान्यक्रम दिला जातो. योजनेत समाविष्ट रस्त्यांना मिळणाऱ्या एकूण निधीत पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्तीसह निधीचा समावेश केला गेला आहे. तसेच ज्या रस्त्यावर गरज आहे तिथे १५० मीटर लांबीच्या पुलांचा समावेशदेखील करण्यात आला आहे. या योजनेचे कार्यान्वयन राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडून होते. तसेच या योजनेच्या तिसऱ्या फेजमधील कालावधी २०१९-२० ते २०२४-२५ पर्यंत निर्धारित केला गेला आहे.
श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीनुसार सातारा लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघांतील एकूण ३७ रस्त्यांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्यापैकी कराड तालुक्यातील मसूर–वाण्याचीवाडी-हणबरवाडी - निगडी या ६.९७ कि.मी.च्या रस्त्यासाठी ४ कोटी ४० लक्ष ८३ हजार रुपये व मनू-उंडाळे ते तुळसण (प्रजिमा ५६) या ४.१९ कि.मी. रस्त्यासाठी २ कोटी ७५ लाख ९९ हजार रुपये मंजूर झाले आहेत. यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे, तर प्रधानमंत्री ग्रामसडकचे कार्यकारी अभियंता संदीप खलाटे, उपकार्यकारी अभियंता विलास पानस्कर, कराडचे शाखा अभियंता विजय जाधव यांचे प्रशासकीय कार्यवाहीसाठी सहकार्य लाभले.