नगरपालिका क्षेत्रातील विकासकामांकरिता सात कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:35 AM2021-08-01T04:35:44+5:302021-08-01T04:35:44+5:30
खंडाळा : ‘वाई मतदारसंघातील शहरी भागातील आवश्यक कामांना गती मिळावी व नागरिकांच्या समस्या तातडीने दूर व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाच्या ...
खंडाळा : ‘वाई मतदारसंघातील शहरी भागातील आवश्यक कामांना गती मिळावी व नागरिकांच्या समस्या तातडीने दूर व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाच्या नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत वाई, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर नगरपालिकांच्या विकासकामांकरिता रुपये ७ कोटी मंजूर झाले आहेत,’ असे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.
मकरंद पाटील म्हणाले, ‘वाई नगर परिषद हद्दीतील ब्रिटिशकालीन दगडी कमानीचा पूल हा शहरातील मुख्य मार्गावरील महत्त्वाचा पूल असून, या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. या पुलास १०० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली असल्याने हा पूल धोकादायक झाला असल्याने या पुलाच्या नवीन बांधकामासाठी यापूर्वी १३ कोटी निधी उपलब्ध झाला असून, या पुलाचे स्ट्रक्चरवर आकर्षक दगडाचे क्लँडिग करणे आवश्यक असल्याने याकामासाठी जादा खर्च २ कोटी येणार असल्याने या कामासाठी शासनाकडून २ कोटी मंजूर केले असल्याने आता या पुलासाठी १५ कोटी निधी उपलब्ध झाला आहे. तसेच पाचगणी हे जागतिक पर्यटन केंद्र असल्याने येथील मुख्य बाजारपेठेतील टेबललँड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकापर्यंत दुतर्फा आरसीसी बंदिस्त गटार्स करणे आवश्यक असल्याने या कामासाठी रुपये २ कोटी ५६ लाख मंजूर झाले आहेत. तसेच महाबळेश्वर नगर परिषद क्षेत्रामध्ये महिलांसाठी योगा हॉल, अंडरग्राऊंड केबल, स्ट्रीट लाइट पोल बसविणे, संरक्षक भिंत दुरुस्ती, रस्ते काँक्रिटीकरण, गटार्स दुरुस्ती आदी कामांसाठी रुपये १ कोटी ८९ लाख मंजूर झाले आहेत.
(चौकट)
वाई नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रं. १ या शाळेची इमारत जुनी असल्याने शाळेतील मुलांना धोका होऊ नये, यासाठी नवीन इमारतीच्या बांधकामासाठी नगर परिषदांना सहाय्यक अनुदान व कर्जे अंतर्गत रुपये ४ कोटी ६ लाख मंजूर झाले असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.