सेवागिरी रथोत्सवासाठी ७ लाख भाविक - वेदावती तीरी विसावला जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:11 AM2019-01-05T01:11:45+5:302019-01-05T01:12:38+5:30
‘परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराज की जय’, ‘ओम नमो नारायणा..’च्या जयघोषात बेलफुलांची उधळण करत मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात शुक्रवारी श्री सेवागिरी
पुसेगाव : ‘परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराज की जय’, ‘ओम नमो नारायणा..’च्या जयघोषात बेलफुलांची उधळण करत मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात शुक्रवारी श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव पार पडला. महाराष्टसह कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांमधील सुमारे सात लाखांहून अधिक भाविक उपस्थित होते.
श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती महंत श्री सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेश जाधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस पहाटे अभिषेक, मंत्रपुष्पांजली अर्पण करून आरती करण्यात आली. प्रारंभी फुलांनी सजवलेल्या मानाच्या रथामध्ये श्री सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुकांची प्रतिष्ठापना केली.
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता रथपूजन करण्यात आले. यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार बाबूराव माने, मठाधिपती सुुंदरगिरी महाराज, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास श्ािंदे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधिकारी धीरज पाटील, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेश जाधव, ट्रस्टचे माजी चेअरमन व पदाधिकारी, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार जयश्री आव्हाड, सभापती कल्पना मोरे, सरपंच हेमा गोरे, उपसरपंच प्रकाश जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, अर्जुन मोहिते, मानाजीकाका घाडगे, महेश नलवडे, जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.
श्री सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणुकीस सकाळी अकराला प्रारंभ झाला. भाविकांनी नारळ, बेलफूल, पुष्पहार, पेढे व नोटांच्या माळा रथावर अर्पण केल्याने श्री सेवागिरी महाराजांचा मानाचा रथ नोटांनी सजला होता. सुवर्णनगरीमध्ये आलेल्या भाविकांनी श्री सेवागिरी मंदिरात संजीवन समाधीच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. मंदिरात श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे भक्तांना बुंदी प्रसादाचे वाटप केले. सेवागिरी मंदिरावर विद्युत रोषणाई केली होती. ही मिरवणूक सातारा-पंढरपूर या मार्गाने यात्रास्थळावर पोहोचली. यात्रास्थळावरून मिरवणूक परतल्यानंतर ती रात्री उशिरा मंदिरात परतली. बारा ते चौदा तास रथ मिरवणूक झाली.
रथावरील नोटा पोलीस बंदोबस्तात एकत्र
रथयात्रा संपल्यानंतर रथावरील नोटांच्या माळा व देणगी रक्कम पोलीस बंदोबस्तात एकत्र करून श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. येथील विविध बँकेचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांनी या रकमेचे मोजण्याचे काम सुरू केले, रात्री उशिरापर्यंत रक्कम मोजण्याचे काम सुरू होते.
खेळण्यांकडे गर्दी
जातिवंत खिलार जनावरांचा बैलबाजार पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. यात्रेत बालगोपाळ, युवक, युवतींसह यात्रेकरुंनी रेल्वे, धडकगाडी, आकाशी पाळण्यात बसण्याचा आनंद लुटला. गरमागरम तारेसारखी जिलेबी, फरसाणा व इतर मिठाईचा आस्वाद घेण्यासाठी अनेकांनी हॉटेलमध्ये गर्दी केली होती. सौंदर्यप्रसाधने खरेदीसाठी युवती व महिलांची झुंबड उडालेली होती. आरोेग्य विभागाने मंदिर व यात्रा परिसरात चार वैद्यकीय पथके ठेवली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे व सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके व पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव शुक्रवारी उत्साहात पार पडला. यावेळी राज्यभरातून लाखो भाविक दाखल झाले होते.