जिल्ह्यातील ७ प्राथमिक आरोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:29 AM2021-06-01T04:29:49+5:302021-06-01T04:29:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने जिल्ह्याला १३ रुग्णवाहिका दिल्या आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने जिल्ह्याला १३ रुग्णवाहिका दिल्या आहेत. यामधील ६ जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, तर ७ रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही तत्काळ उपचार मिळणे सोईस्कर होणार आहे.
जिल्ह्यात मागील एक वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. जिल्ह्यात सध्या दुसरी लाट सुरू आहे. एप्रिल महिन्यापासून दररोज हजारोंच्या संख्येत बाधित सापडत आहेत. बाधितांच्या संख्येत राज्यात सातारा जिल्हा पहिल्या १० मध्ये असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यात उपाययोजना अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्या अनुषंगाने शासनाने जिल्ह्याला रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला.
कोरोना परिस्थितीत बाधितांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करता यावे, यासाठी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याला १३ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्यामुळे, या रुग्णवाहिकांचा फायदा ग्रामीण भागातील अत्यावश्यक रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी होणार आहे. आता मिळालेल्या १३ मधील रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालय, तसेच मेढा, औंध, वाई, गोंदवले ग्रामीण रुग्णालय तर फलटण उपजिल्हा रुग्णालयालाही रुग्णवाहिका देण्यात आली. त्याचबरोबर सातारा रोड, वाठार स्टेशन, म्हसवड, पुळकोटी, मलवडी, बामणोली, वाठार स्टेशन या प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही प्रत्येकी एक रुग्णवाहिका देण्यात आली आहे.
...........