सातारा जिल्ह्यातल्या रस्त्यांसाठी ७ हजार कोटी!

By Admin | Published: March 27, 2016 12:05 AM2016-03-27T00:05:02+5:302016-03-27T00:16:35+5:30

१६५ किलोमीटरचे भाग्य उजळणार : म्हसवड-सातारासह पालखी मार्गाचाही समावेश

7 thousand crore for roads in Satara district! | सातारा जिल्ह्यातल्या रस्त्यांसाठी ७ हजार कोटी!

सातारा जिल्ह्यातल्या रस्त्यांसाठी ७ हजार कोटी!

googlenewsNext

सातारा : केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने २६ हजार ८६८ कोटी खर्चाच्या रस्ता विकासकामाचे उद्घाटन सोलापूरमध्ये शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हा सोहळा सोलापूरमध्ये होत असला तरी यामुळे सातारा जिल्ह्यातील १६५ किलोमीटरच्या रस्त्याचे भाग्य उजळणार असून जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पंढरपूर-फलटण-आळंदी पालखी मार्गाचाही समावेश आहे.
कोणत्याही भागाचा विकास व्हायचा असेल त्या भागातील दळणवळणाची सोय महत्त्वपूर्ण असते. कृष्णा-कोयना काठचा सुजलाम्-सुफलाम् भूप्रदेश, अनेक धरणे लाभलेला सातारा जिल्हा साखरपट्टा म्हणून नावारूपास आला. मुबलक पाण्यामुळे शिरवळ, लोणंद, सातारा, कऱ्हाड येथील औद्योगिक वसाहतींचा झपाट्याने विकास झाला.
सातारा जिल्ह्यातून गेलेल्या सुमारे १४० किलोमीटरच्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गामुळे दळणवळण सुधारलेले असतानाच या मार्गावरील पुणे ते शेंद्रे दरम्यानच्या सहापदरीकरण्याचे काम सुरू झाले आहे. पुणे-कोल्हापूर या मार्गावरील रस्त्याची चांगली अवस्था असतानाच पूर्वेकडील फलटण, माण, खटाव तालुक्यांतील रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती होणे गरजेचे होते.
केंद्र शासनाने तत्त्वत: मंजूर केलेल्या पंढरपूर-फलटण-आळंदी पालखी मार्गासाठी ३,७०० कोटी, म्हसवड-पिलीव-पंढरपूर मार्गासाठी १,४०० कोटी तसेच सातारा-म्हसवड-अकलूज-बार्शी-येडशी या मार्गासाठी १,९०० कोटींची तरतूद केली आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यातून जाते. लोणंद शहरात आल्यानंतर तरडगाव, फलटण, विडणी, पिंप्रद, बरड मार्गे राजुरी येथे ही पालखी जाते. या रस्त्याच्या विकासासाठी १,९०० कोटींची तरतूद केली आहे. या मार्गाचे यापूर्वीच चौपदरीकरण झाले आहे. त्यातूनही लोणंद ते फलटण दरम्यानचा रस्ता सुस्थितीत असला तरी फलटण ते राजुरी दरम्यानचा रस्ता खराब असल्याने या मार्गावर वारकऱ्यांचा प्रवास खडतर असतो. नवीन कामे झाल्या माउलीच्या दर्शनाला निघालेल्या वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यास निश्चित मदत होणार आहे.
याबरोबरच म्हसवड-पिलीव-पंढरपूर मार्गावर म्हसवड ते धुळदेव हा दहा ते बारा किलोमीटर रस्त्याचे काम होणार आहे. तसेच सातारा-म्हसवड-अकलूज-बार्शी-येडशी या मार्गावर सातारा ते जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या कारखेल या शंभर किलोमीटरच्या रस्त्याचे काम होणार आहे. या मार्गावर कोरेगाव, पुसेगाव, दहिवडी, गोंदवले, म्हसवड ही महत्त्वाची गावे येत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 7 thousand crore for roads in Satara district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.