जिल्ह्यातील ७० गावे अंधारात
By Admin | Published: June 25, 2015 12:59 AM2015-06-25T00:59:56+5:302015-06-25T01:01:04+5:30
धुवाधार पाऊस : कास, बामणोली, तापोळा परिसरातील जनजीवन विस्कळीत; शनिवारपासून वीजपुरवठा खंडित
सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा परिसरात वाऱ्यासह धुवाधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत पडणारा पाऊस आणि ठिकठिकाणी झाडे पडल्याने कास, बामणोलीसह कांदाटी खोऱ्यातील ७० हून अधिक गावे शनिवारपासून अंधारात आहेत. बुधवारी कास पुलावरून पाणी वाहू लागल्याने बामणोलीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे साताऱ्याशी असणारा त्या गावांचा संपर्क तुटला आहे.
सातारा शहराच्या पश्चिम भागात कास, बामणोली, तापोळा परिसरातील दुर्गम भागात अनेक गावे वसली आहेत. या परिसरात नेहमीच पावसाची संततधार असते; पण यावर्षी जून महिन्यातच पावसाने जोरदार सुरुवात केली आहे.
वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून पुन्हा धुवांधार पडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिसरातील अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. त्यामुळे विजेचे खांब वाकणे, तारा तुटणे, असे प्रकार घडले आहेत. परिणामी शनिवारपासून कास, बामणोली, तापोळा, कांदाटी खोऱ्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. संततधार पावसामुळे वीज सुरळीत करण्याचे प्रयत्न अपुरे पडू लागले आहेत.
बामणोली, तापोळा भागातील लोकांना साताऱ्याला यायचे असेल, तर कास मार्गे यावे लागते; पण कास तलावाशेजारील पुलावरून सध्या चार-पाच फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कास तसेच बामणोली भागातील लोकांचा साताऱ्याशी संपर्क तुटलेला आहे. कास पुलावरील पाणी कमी झाल्यानंतरच पुन्हा संपर्क सुरू होणार आहे. सध्या कास पठार, बामणोली, तापोळा भागातील लोक पावसाच्या उघडिपीची वाट पाहत आहेत. (वार्ताहर)