७६ जीव घेणारे वळण होणार सरळ : खंबाटकीतील ‘एस’ वळण होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:56 PM2018-12-20T23:56:36+5:302018-12-20T23:58:34+5:30
गेल्या दहा वर्षांत तब्बल ७६ जणांचे प्राण घेणारे व २८१ जणांना जखमी करणारे खंबाटकी घाटातील धोकादायक ‘एस’ वळण आता सरळ होणार आहे. दोन नवीन बोगदे व महामार्ग रुंदीकरणात हे वळण निघणार
मुराद पटेल।
शिरवळ : गेल्या दहा वर्षांत तब्बल ७६ जणांचे प्राण घेणारे व २८१ जणांना जखमी करणारे खंबाटकी घाटातील धोकादायक ‘एस’ वळण आता सरळ होणार आहे. दोन नवीन बोगदे व महामार्ग रुंदीकरणात हे वळण निघणार असून, धोकादायक वळणावरील अपघातांच्या मालिकेला आता पूर्णविराम मिळणार आहे.
खंबाटकी बोगद्याच्या निर्मितीनंतर घाटाच्या वळणावर ‘एस’ प्रकारचे वळण दिल्याने याठिकाणी अपघाताचे ग्रहण लागत अपघातांची मालिका घडू लागल्याने पोलीस प्रशासनाकडून खंबाटकी घाटातील एस वळणला उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात आले होते. याठिकाणी होणाऱ्या अपघाताची संख्या व मृत्यूचे प्रमाण पाहता संबंधित एस वळण काढण्याची मागणी प्रवासी, वाहतूकदार व प्रशासनाकडून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे करण्यात येत होती. याबाबत कायम नागरिकांच्या मागणीला ‘लोकमत’ने सातत्याने सचित्र वृत्त देत नागरिकांच्या मागण्यांचा पाठपुरावा राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे केला आहे.
खंबाटकी घाटात दोन नवीन अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त बोगदे निर्माण करत असताना प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कर्दनकाळ ठरलेल्या एस वळण काढण्याला प्राधान्य दिले आहे. यामध्ये खंबाटकी घाटातील बोगद्यांमधून बाहेर पडल्यानंतर दिलेले वळण सरळ करत आताच्या महामार्गामध्ये रुंदीकरण करताना ‘एस’ वळण काढत एस कॉर्नरच्या काही अंतरावरून रस्ता सरळ करत खंबाटकी घाटातील जुन्या टोलनाक्यापर्यंत महामार्ग तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जुन्या टोलनाक्याजवळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपुलाची निर्मिती करणार आहे.
अपघातानंतर तत्काळ आपत्कालीन सेवा
खंबाटकी घाटामध्ये निर्माण करण्यात येणाºया बोगद्यांमध्ये अपघात घडल्यास अत्याधुनिक सुविधांमुळे त्याचठिकाणी लगेच कार्यान्वित करण्यात येणाºया आपत्कालीन व्यवस्थेला माहिती मिळत अपघातग्रस्तांना मदत तत्काळ उपलब्ध होणार आहे. याकरिता याठिकाणी दोन नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे.
खंबाटकी घाटात अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ‘एस’ वळण काढण्याला व महामार्ग सरळ करण्याला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने प्राधान्य दिले आहे. याठिकाणी उड्डाणपूल व दरी, पुलाची निर्मिती करण्यात येत असल्याने या ठिकाणावरून वाहतूक सुरळीत होऊन प्रवाशांचा प्रवास हा सुरक्षित व सुखकर होण्यास मदत होणार आहे.
- श्रीकांत पोतदार, उपमहाव्यवस्थापक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे