बेदरकार तब्बल ७६२ चालक पसार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:48 AM2021-04-30T04:48:41+5:302021-04-30T04:48:41+5:30
कऱ्हाड : वाहनांचा वेग वाढलाय; पण हा वाढता वेग पादचाऱ्यांच्या जिवावर बेततोय. अनेकवेळा पादचाऱ्याला वाहनाची धडक बसते. त्यावेळी काही ...
कऱ्हाड : वाहनांचा वेग वाढलाय; पण हा वाढता वेग पादचाऱ्यांच्या जिवावर बेततोय. अनेकवेळा पादचाऱ्याला वाहनाची धडक बसते. त्यावेळी काही चालक तेथेच थांबतात. मात्र, काही चालक वाहनासह पसार होतात. कऱ्हाड उपविभागात गत दहा वर्षांत अशा ‘हिट अॅण्ड रन’च्या शेकडो घटना घडल्या असून, तब्बल ७६२ चालक पसार झाले आहेत.
कऱ्हाड उपविभागात ‘हिट अॅण्ड रन’च्या अनेक गुन्ह्यांचा तपास पोलिसांना लावता आलेला नाही. सरासरी दर आठवड्याला महामार्गावर अशाप्रकारची घटना घडते. चालकांच्या असंवेदनशीलतेमुळे आतापर्यंत शेकडो बळी गेले आहेत. महामार्ग देखभाल विभागाचा नाकर्तेपणा, चुकीच्या पद्धतीने महामार्ग ओलांडणे, सेवा रस्त्यावरून वेगात वाहने चालविणे आदी कारणेही अपघातास कारणीभूत ठरतात. महामार्गासह सेवा रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याच्या घटना वारंवार घडत असून, राज्य मार्गांवरील घटनांचा आकडाही मोठा आहे. महामार्गावर होणाऱ्या अशा बहुतांश अपघातांना रस्ते देखभाल विभागच कारणीभूत असल्याचे दिसते. महामार्गावर अनेक ठिकाणी संरक्षक जाळ्या तुटल्या आहेत. त्यामधून चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न पादचारी करतात. तसेच महामार्गावर वाहनाच्या वेगाचा अंदाज येत नाही. मात्र, तरीही पादचारी चुकीच्या पद्धतीने महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात. ज्याठिकाणी असे चुकीचे मार्ग आहेत, ते बंद करण्याची जबाबदारी रस्ते देखभाल विभागाची आहे. मात्र, ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली जात नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळते.
वास्तविक, ‘हिट अॅण्ड रन’च्या बहुतांश घटना सायंकाळनंतर घडतात. त्यामुळे त्या कोणाच्या लक्षात येत नाहीत. जखमीस मदत मिळणे गरजेचे असताना, कोणाचेही लक्ष नसल्याने त्याला आपला जीव गमवावा लागतो. अशा घटना टाळण्यासाठी महामार्ग देखभाल विभागानेच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- चौकट
३५३ अपघातात १४१ चालक संवेदनशील
कऱ्हाड उपविभागात गत तीन वर्षांत ३५३ अपघात झाले. त्यापैकी २४१ वाहनधारकांनी संवेदनशीलता दाखवत अपघातस्थळीच थांबणे पसंत केले; तर ११२ चालक अपघातस्थळावरून पसार झाले आहेत.
- चौकट
‘हिट अॅण्ड रन’चे दहा वर्षांत गुन्हे
२०१० : ९७
२०११ : ९९
२०१२ : ७५
२०१३ : ९३
२०१४ : १०१
२०१५ : ६२
२०१६ : ५५
२०१७ : ६८
२०१८ : ७९
२०१९ : ११
२०२० : २२
- चौकट
आरोपी सापडेपर्यंत तपास सुरूच!
अनेक वाहनचालक अपघाताच्या खाणाखुणा मिटवून बिनधास्त आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी अथवा भविष्यात कधी जर तो अपघाताची जाणीव होऊन पोलीस ठाण्यात आलाच, तर त्याची चौकशी व्हावी, यासाठी ‘हिट अॅण्ड रन’च्या प्रत्येक गुन्ह्याची फाईल आरोपी सापडेपर्यंत न्यायालयाच्या परवानगीने ‘ओपन’ ठेवली जाते, असे पोलीस सांगतात.
- चौकट
पोलीस दप्तरी चालक अज्ञात
अपघात करून वाहनासह चालक पसार झाला, तर स्थानिक पोलिसांकडून त्याचा तपास होतो. संबंधित वाहन कोणी पाहिले आहे का, याची प्रथम चौकशी केली जाते. वाहनाचा क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न होतो. त्यातून वाहनाच्या चालकापर्यंत पोहोचता येते. मात्र, वाहनाबाबत कसलीच माहिती मिळाली नाही, तर अज्ञात वाहनचालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला जातो.
फोटो : २९केआरडी०१
कॅप्शन : प्रतिकात्मक