पंचायत समित्यांची ८ सभापतिपदे राखीव
By admin | Published: January 19, 2017 11:12 PM2017-01-19T23:12:31+5:302017-01-19T23:12:31+5:30
महिलांसाठी सहा : महाबळेश्वर, कोरेगाव, खटाव खुले; जि. प.च्या अनेक सदस्यांना तालुक्यात परतीचे वेध
सातारा : जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोरेगाव व खटाव वगळता इतर आठ पंचायत समित्यांची सभापतिपदे राखीव झाली आहेत. गुरुवारी झालेल्या सोडतीमध्ये अनेक दिग्गज इच्छुकांची संधी चिठ्ठीने हिरावून घेतली, तर अनेकांना तालुक्यात परतण्याचे वेध लागले.
जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापतिपदाची सोडत गुरुवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, तहसीलदार विवेक जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनात काढण्यात आली. आपल्या तालुक्यात कोणते आरक्षण पडते? हे पाहण्यासाठी जिल्हाभरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
महाबळेश्वर, कोरेगाव व खटाव तालुक्यांत आरक्षण खुले पडले असल्याने या तालुक्यातील मातब्बर मंडळींना संधी मिळणार आहे. साताऱ्याचे सभापती इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. कऱ्हाडचे सभापतिपद इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. पाटणला सर्वसाधारण महिला, जावळीला सर्वसाधारण महिला, वाईत सर्वसाधारण महिला, फलटणला सर्वसाधारण महिला, माणमध्ये अनुसूचित जाती, खंडाळ्यात इतर मागास प्रवर्ग असे सभापतिपदाचे आरक्षण पडले आहे. (प्रतिनिधी)
माणचे त्रांगडे सुटले!
माणचे सभापतिपद आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती महिलेसाठी पडले होते. मात्र, तालुक्यातील दहा गणांत हे आरक्षणच नाही. त्यामुळे सभापती निवडणार कसा? हे त्रांगडे झाले. सोडतीवेळी काही मंडळींनी त्यावर आक्षेप घेतला. त्यावर मार्डी गटात अनुसूचित जातीचे आरक्षण आहे. या परिस्थितीत सभापतिपद रिक्त राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सभापतीचे आरक्षण महिला राखीवऐवजी अनुसूचित जाती, असे करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.
तालुकानिहाय या गणांना सभापतिपदाची संधी
सातारा : दरे खुर्द, नागठाणे
(इतर मागास प्रवर्ग)
कऱ्हाड : मसूर, येळगाव, कार्वे
(इतर मागास प्रवर्ग महिला)
पाटण : चाफळ, सणबूर, तारळे, नाटोशी, कुंभारगाव (सर्व स्त्री)
महाबळेश्वर : वाडाकुंभरोशी (सर्वसाधारण)
जावळी : सायगाव, म्हसवे (सर्वसाधारण महिला)
कोरेगाव : पिंपोडे बुद्रुक, वाठार किरोली, कुमठे, एकंबे (सर्वसाधारण)
वाई : भुर्इंज, शेंदूरजणे
(सर्वसाधारण महिला)
फलटण : साखरवाडी, तरडगाव, हिंगणगा
व, पाडेगाव
(सर्वसाधारण महिला)
खटाव : मायणी, औंध, बुध, कातरखटाव (सर्वसाधारण)
माण : मार्डी (अनुसूचित जाती)
खंडाळा : नायगाव
(इतर मागास प्रवर्ग)