प्रजासत्ताकदिनी साताऱ्यात ८० जणांचा आत्मदहनाचा इशारा, पोलिस सतर्क
By नितीन काळेल | Published: January 25, 2024 06:28 PM2024-01-25T18:28:54+5:302024-01-25T18:30:12+5:30
सातारा : दरवर्षीच प्रजासत्ताकदिनी आंदोलने, आत्मदहन, उपोषणाचा इशारा देण्यात येतो. यावर्षीही तब्बल १३० हून अधिक निवेदने आली आहेत. यामध्ये ...
सातारा : दरवर्षीच प्रजासत्ताकदिनी आंदोलने, आत्मदहन, उपोषणाचा इशारा देण्यात येतो. यावर्षीही तब्बल १३० हून अधिक निवेदने आली आहेत. यामध्ये आत्मदहनासाठीची ८०, उपोषणाची ५० आहेत. यामुळे जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर असलेतरी त्यांची दमछाक होऊ शकते.
संस्था, लोकांच्या अनेक मागण्या असतात. या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी संबंधितांकडून आंदोलन, मोर्चा, उपोषण, आत्मदहनसारखी पावले उचलली जातात. पण, दरवर्षीच स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनादिवशी आंदोलकांची संख्या मोठी असते. यासाठी अगोदरच जिल्हाधिकारी तसेच इतर संबंधित शासकीय कार्यालयात आंदोलनाचे स्वरुप काय असणार आणि मागणी काय याबाबत निवेदन दिले जाते. त्यानंतर प्रशासन काहींशी संपर्क साधून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करते. तर काहीजण हे आंदोलनावर ठाम असतात.
यामुळे दरवर्षीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन, उपोषणकर्त्यांची संख्या अधिक असते. तसेच जिल्हा परिषदेसह इतर शासकीय कार्यालयाशी संबंधित लोक त्या-त्या कार्यालयापुढे आंदोलन करतात. तरीही जिल्हाधिकारी कार्यालयापुढील आंदोलने अधिक ठरतात. यापार्श्वभूमीवर यावर्षी प्रजासत्ताक दिनाला आत्मदहन, उपोषण, आंदोलन करण्यासाठी जवळपास १३० हून अधिक निवेदने जिल्ह्यातील प्रशासनाकडे आलेली आहे. यामध्ये सर्वाधिक आकडा हा आत्मदहनाचा आहे. तर यातील निवेदन देणारे बहुतांशी सातारा जिल्ह्यातील आहेत.
आंदोलन कोठेही करु शकतात..
आंदोलने, उपोषणाबाबत अधिक करुन निवेदने हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतात. आता प्रजासत्ताक दिनाला आंदोलन, उपोषण आणि आत्मदहनाबाबत १३० हून अधिक निवेदने जिल्ह्यात देण्यात आलेली आहेत. हे आंदोलन साताऱ्यातील शासकीय कार्यालयापुढे होऊ शकते. तसेच तालुका असो किंवा पुणे, मुंबईच्या कार्यालयापुढेही होऊ शकते.