साताऱ्यात वाळू माफियांची ८० वाहने जप्त, ४.४१ कोटींचा दंड; खनिकर्म विभागाची कारवाई 

By दीपक शिंदे | Published: March 11, 2024 03:20 PM2024-03-11T15:20:08+5:302024-03-11T15:20:21+5:30

अवैध उत्खननाची १८४ प्रकरणे उघड

80 vehicles of sand mafia seized in Satara, fined 4.41 crores | साताऱ्यात वाळू माफियांची ८० वाहने जप्त, ४.४१ कोटींचा दंड; खनिकर्म विभागाची कारवाई 

साताऱ्यात वाळू माफियांची ८० वाहने जप्त, ४.४१ कोटींचा दंड; खनिकर्म विभागाची कारवाई 

सातारा : अवैध वाळू उपसा करून कोट्यवधी रुपये झटपट कमवण्याच्या इच्छेने अनेकजण वाळू तस्करीकडे वळत आहेत. या वाळू माफियांवर जिल्हा गौण खनिज विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असते. अनेक पोलिस ठाण्यांत वाळू तस्करांवर गुन्हेदेखील दाखल झाले आहेत व वाहनेदेखील जप्त करण्यात आली आहेत.

सातारा जिल्ह्यात १ एप्रिल ते १ मार्च या कालावधीत अवैध वाळू व उत्खननाची १८४ प्रकरणे उघड झाली त्यात वाळू, मुरूम, माती, दगड या प्रकारची गौण खनिजे असून त्यात ४ कोटी ४१ लाख ८१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

४.४१ कोटींचा दंड

सातारा जिल्ह्यात १ एप्रिल २०२३ ते १ मार्च २०२४ पर्यंत अवैध उत्खनन व वाहतुकीच्या १८४ प्रकरणात ४.४१ कोटी रुपये दंड आकारला आहे. त्यापैकी १ कोटी ८६ लाख ४९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय सहाजणांवर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

तस्करी करणारी वाहने जप्त

अवैध रेतीची तस्करी करताना गौण खनिज विभागाकडून वाहने जप्त करण्यात येतात. जिल्हा खनिकर्म विभागाकडून आतापर्यंत ८० वाहने जप्त करण्यात आली आहेत.
अनेकदा बरेच दिवस ती वाहने संबंधित पोलिस स्टेशन हद्दीत जमा असतात तर काही तहसील कार्यालयांच्या आवारात पडून असतात.

लिलाव करून पैसे वसूल करणार

रेती तस्करी करणारे अनेक वेळा जुन्या वाहनांचा वापर करतात. त्यामुळे प्रशासनाने एखादे वेळी वाहने जप्त केल्यास वाहन मालकांचे फारसे नुकसान होत नाही. त्यामुळे अनेकदा जप्त करण्यात आलेले वाहन सोडविण्याच्या भानगडीत वाहन मालक पडत नाहीत. मात्र, विनाकारण जागा अडकून पडते. या कार्यालयांच्या आवारात सध्या जागा अपुरी पडत आहे.

जिल्ह्यात अवैध गौण खनिजाचा उपसा रोखण्यासाठी सातत्याने कारवाई करण्यात येत असून भरारी पथकाद्वारे संबंधित ठिकाणी पाहणी करण्यात येते. ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. - अमोल थोरात, जिल्हा खनिकर्म अधिकारी, सातारा

Web Title: 80 vehicles of sand mafia seized in Satara, fined 4.41 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.