दागिने काढून घेतले अन् पुडीत दगड बांधून दिले, साताऱ्यातील व्यावसायिकाला ८० हजारांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 06:01 PM2022-04-16T18:01:42+5:302022-04-16T18:09:12+5:30
सातारा: पोलिसांची पुढे तपासणी सुरू आहे, दागिने कशाला घातले आहेत, असे म्हणून एका व्यावसायिकाकडून दागिने काढून घेतले अन् त्या ...
सातारा: पोलिसांची पुढे तपासणी सुरू आहे, दागिने कशाला घातले आहेत, असे म्हणून एका व्यावसायिकाकडून दागिने काढून घेतले अन् त्या बदल्यात पुडीमध्ये त्यांना दगड बांधून दिले. अशा प्रकारे तीन तोतया पोलिसांनी संबंधित व्यावसायिकाला ८० हजारांना गंडा घातला असल्याचे समोर आले आहे. ही घटना औद्योगिक वसाहतीमधील ओतारी कोल्ड स्टोअरेजच्यासमोरील रस्त्यावर काल, शुक्रवारी उशिरा रात्री ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मण महादेव साळुंखे (वय ८१, रा. गुरुवार पेठ, सातारा) हे मंडप व्यावसायिक असून, शुक्रवारी रात्री ते दुचाकीवरून बाॅम्बे रेस्टाॅरंट परिसरात गेले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना दुचाकी बाजूला घ्या, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी दुचाकी थांबवली. ‘आम्ही पोलीस असून, तुमचे लायसन्स दाखवा,’ असे साळुंखे यांना त्यातील एक जण म्हणाला. ही चर्चा सुरू असतानाच तिथे आणखी एक युवक आला. तो पोलीस अधिकारी असल्याचे साळुंखे यांना सांगण्यात आले.
त्याने साळुंखे यांना हातात अंगठ्या कशाला घातल्या आहेत. पुढे पोलिसांची तपासणी सुरू आहे, असे सांगितले. ‘अंगठ्या काढून द्या, मी पुडीत ठेवून देतो,’ असे म्हटल्यावर साळुंखे यांनी दोन्ही अंगठ्या काढून त्यांच्याजवळ दिल्या. त्यातील एका युवकाने ही पुडी खिशात ठेवा आणि घरी जा, असे साळुंखे यांना सांगितले. त्यानंतर संबंधित युवक तेथून निघून गेले. साळुंखेही दुचाकीवरून घरी यायला निघाले. मात्र, काही अंतर पुढे आल्यानंतर त्यांना शंका आली. खिशातील पुढी काढून त्यांनी पाहिली असता त्यामध्ये अक्षरश: दोन दगड होते.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साळुंखे यांनी पुन्हा दुचाकी वळवून त्या तिघांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. सरतेशेवटी साळुंखे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. जिथं ही घटना घडली त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागलेला नाही.