‘कृष्णा’साठी ८०.७३ टक्के मतदान

By Admin | Published: June 21, 2015 10:47 PM2015-06-21T22:47:47+5:302015-06-22T00:22:58+5:30

भरपावसात मतदारांच्या रांगा : ६४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

80.73 percent polling for 'Krishna' | ‘कृष्णा’साठी ८०.७३ टक्के मतदान

‘कृष्णा’साठी ८०.७३ टक्के मतदान

googlenewsNext

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक-शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी भरपावसात उत्साहाने मतदान झाले. पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्यासाठी १७५ मतदान केंद्रांवर ८०.७३ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. २१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत एका अपक्षासह तिन्ही पॅनेलच्या ६४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.सातारा, सांगली जिल्ह्यांतील पाच तालुके कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतात. कृष्णेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून कार्यक्षेत्रात प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या. कृष्णेची निवडणूक यावेळेस प्रथमच तिरंगी झाली. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. रविवारी पहिल्या टप्प्यात सकाळी दहापर्यंत १६.४१ टक्के मतदान झाले होते. सरासरी ७ हजार ५९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडले. बहुतेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारी बारापर्यंत ३६.११ टक्के मतदान झाले. मतदानाचा हा वेग दुपारच्या टप्प्यातही कायम राहिला होता. दुपारी दोनपर्यंत ५८ टक्के मतदान झाले. २६ हजार ८५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारनंतर काहीशी पावसाने उघडीप दिल्याने मतदानाचा वेग वाढत गेला. दुपारी चारपर्यंत ३४ हजार ३१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ७४.११ टक्के इतके मतदान झाले. शेवटच्या टप्प्यात मतदानाचा वेग वाढत गेला. मतदानाची वेळ संपताना सायंकाळी पाच वाजता ३७ हजार ३७५ मतदारांनी मतदान केल्याने सरासरी ८०.७३ टक्के इतके मतदान झाले. एकूण ४५ हजार ८०३ सभासदांपैकी ३७ हजार ३७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रविवारी सकाळपासूनच पावसाने चांगला जोर धरल्याने वडगाव हवेली, कार्वे, काले तसेच रेठरे भागात मतदानावेळी अडथळा जाणवला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांच्यासह तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सूचना केल्या होत्या. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांनीही मतदान केंद्रांवर जाऊन प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेची पाहणी केली. सायंकाळी सहा वाजता मतदान केंद्रांवरील मतपेट्या सील करून कार्वे नाक्यावरील वखार महामंडळाच्या गोदामात आणण्यात आल्या. (प्रतिनिधी)

पाटील भावकीत डांगेंची एन्ट्री
इस्लामपूर : य. मो. कृष्णा सह. साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. मतदानादिवशी वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी दाखविल्याने पहाटे ४ वाजल्यापासून संततधार पावसाला सुरुवात झाली. तरीसुद्धा इस्लामपूर येथे ९० टक्के मतदान झाले. या निवडणुकीत उरुण परिसरातील पाटील भावकीतील तिन्ही उमेदवार एकमेकांविरोधात ठाकले आहेत. यापैकी दोन उमेदवार विजयभाऊ पाटील यांना मानणारे आहेत, तर एक उमेदवार अ‍ॅड. चिमण डांगे यांच्या गटाचा आहे. त्यामुळे पाटील भावकीत डांगे गटाने एन्ट्री करून चांगलीच चुरस निर्माण केली होती. मतदानादिवशी मात्र हे सर्वजण एकत्र राहून मतदान प्रक्रिया खेळीमेळीत पार पाडताना दिसत होते.
या निवडणुकीत उरुण परिसरातील सत्ताधारी संस्थापक पॅनेलमधून विजयभाऊ पाटील यांचे समर्थक युवराज नाना पाटील, डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलमधून विजयभाऊ पाटील यांचे बंधू संजय पाटील, तर डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलमधून डांगे गटाचे चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढविली. हे तिन्ही उमेदवार जयंत पाटील यांचे नेतृत्व मानतात. प्रचार काळात या तिघांनीही चांगलीच हवा निर्माण केली होती. सोमवारी मतदान केंद्रावर मात्र कोणतीही चुरस दिसली नाही. तिन्ही उमेदवारांचे नेते हातात हात घालून मतदान प्रक्रियेची माहिती घेताना दिसत होते.
इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे एकदिलाने वावरतात; परंतु ‘कृष्णा’च्या निवडणुकीत ते एकमेकांच्या विरोधात होते. मतदान केंद्रावर मात्र हे दोन भाऊ चारचाकी गाडीत बसून हसत-खेळत मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. (प्रतिनिधी)


उद्या मतमोजणी
कऱ्हाड येथे कार्वे नाक्यावरील वखार महामंडळाच्या गोदामात मंगळवारी (दि.२३ ) मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार असून, गोदाम परिसरात तिन्ही पॅनेलच्या समर्थकांना थांबण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच कडक पोलीस बंदोबस्तही ठेवला जाणार आहे.


येरवळेत पोलिंग एजंट बदलले
येरवळे येथील एका मतदान केंद्रावर नेमलेल्या पोलिंग एजंटवर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. हे पोलिंग एजंट मतदार नाहीत. त्यांची नावे मतदारयादीत नाहीत. त्यामुळे ते पोलिंग एजंट म्हणून काम करू शकतात का? अशी तक्रार केंद्र प्रमुखांकडे करण्यात आली. केंद्र प्रमुखांनी मतदार नसणाऱ्यांना पोलिंग एजंट म्हणून काम करता येणार नाही, असे सांगून ते पोलिंग एजंट बदलले.

Web Title: 80.73 percent polling for 'Krishna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.