जिल्ह्यातील ८२ महाविद्यालये सुरू; पन्नास टक्के उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:40 AM2021-02-16T04:40:00+5:302021-02-16T04:40:00+5:30
सातारा : कोरोनामुळे तब्बल अकरा महिन्यांनंतर सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सोमवारपासून भरले. बहुतांश महाविद्यालयांमध्ये पहिल्यादिवशी ५० ...
सातारा : कोरोनामुळे तब्बल अकरा महिन्यांनंतर सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सोमवारपासून भरले. बहुतांश महाविद्यालयांमध्ये पहिल्यादिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहिली. महाविद्यालयांनी केलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावल्याने ‘कॉलेज कॅम्पस’ फुलला, बहरला.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यात दि. १५ सप्टेंबरपासून अकरावीचे, तर बारावीचे वर्ग दि. २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. त्यानंतर राज्य शासनाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सूचनेनुसार महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग सोमवारपासून भरले. अकरा महिन्यांनंतर वर्ग बसण्यासह मित्र-मैत्रिणींना भेटता येणार असल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनींमध्ये उत्साह होता. सकाळी साडेसात वाजल्यापासून शहरातील कला व वाणिज्य, डिजी, वाय सी, शिवाजी, एलबीएस आदी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी येऊ लागल्या. काही वेळातच त्यांच्या गर्दीने कॉलेज कॅम्पस फुलला. थर्मल गनने तपासणी आणि मास्क असल्याची खात्री करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कॅम्पस, वर्गात प्रवेश दिला. काही महाविद्यालयांमध्ये प्राचार्य, प्राध्यापकांनी वर्गात जाऊन प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. त्यांना महाविद्यालयाची माहिती दिली. एका बेंचवर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था होती. कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या प्रथम वर्षासह द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनीही वर्गात हजेरी लावली. पहिले दोन तास झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये फेरफटका मारण्यास सुरुवात केली. मैदान, ग्रंथालय, कॅन्टीन, वर्गाबाहेर विद्यार्थ्यांच्या गप्पा रंगल्या. दुपारी तीननंतर कॅम्पसमधील गर्दी कमी झाली. काही कॉलेजमध्ये ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी उपस्थित राहिले. त्यांना आज, मंगळवारपासून हजेरी क्रमांकानुसार उपस्थित राहण्याबाबतची सूचना प्राध्यापकांकडून देण्यात आल्या.
चौकट
सेल्फी घेत आनंद
कॉलेजमध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहिल्याचा आनंद अनेक विद्यार्थ्यांनी आपआपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत सेल्फी घेत व्यक्त केला. व्हॉटस्ॲप, फेसबुकवरही त्यांनी सेल्फी घेतलेली छायाचित्रे शेअर केली.
चौकट
आधी तोंडावर, नंतर हनुवटीवर मास्क
कॉलेजमध्ये प्रवेश करताना विद्यार्थ्यांच्या तोंडावर मास्क होता. त्यांनी हातावर सॅनिटायझर घेतले. मात्र, वर्ग सुटल्यानंतर अधिकतर जणांच्या हनुवटीवर मास्क होता. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये असेच चित्र दिसून आले.
कोट :
शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून महाविद्यालय सुरू केले. विद्यार्थ्यांना कुठल्याहीप्रकारे संसर्ग होऊ नये याची पुरीपूर खबरदारी घेतली आहे. विद्यार्थी यांना सुरक्षित करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत.
- जयेंद्र चव्हाण, संघटक कला व वाणिज्य महाविद्यालय