कोयना धरणात ८२ टीएमसी पाणीसाठा, पावसाचा जोर ओसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:56 PM2018-07-20T12:56:21+5:302018-07-20T12:57:46+5:30
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला आहे. कोयना, महाबळेश्वर, नवजा येथे पडलेल्या पावसामुळे धरणात २७ हजार ७५९ क्युसेक आवक सुरू आहे. धरणातून १७ हजार ४५४ क्युसेक विसर्ग सुरू असल्याने पाणीसाठा संथगतीने वाढत आहे. धरणात सध्या ८२.५४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
सातारा/पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला आहे. कोयना, महाबळेश्वर, नवजा येथे पडलेल्या पावसामुळे धरणात २७ हजार ७५९ क्युसेक आवक सुरू आहे. धरणातून १७ हजार ४५४ क्युसेक विसर्ग सुरू असल्याने पाणीसाठा संथगतीने वाढत आहे. धरणात सध्या ८२.५४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
सातारा जिल्ह्यात गेले पंधरा दिवस धो-धो पाऊस पडत होता. त्यामुळे सर्वच धरणांमध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढत होता. त्या तुलनेत गुरुवारपासून पावसाचा जोर मंदावला. शुक्रवारीही सकाळपासून अधूनमधून रिमझिम पाऊस पडत आहे.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासांत कोयना येथे ९३, नवजा १२९ तर महाबळेश्वर येथे ७१ मिलीमीटर पाऊस पडला. तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : सातारा १०.८०, जावळी १५.८२, पाटण २१.२७, कऱ्हाड ७.१५, कोरेगाव ३.०२, खटाव १.७३, माण ०.१४, फलटण ०, खंडाळा १.७०, वाई ४.४६, महाबळेश्वर ९८.६०.