केवळ २८ दिवसात ८४ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:25 AM2021-06-23T04:25:53+5:302021-06-23T04:25:53+5:30

पाच हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या व शूरवीरांचा वारसा लाभलेल्या तळबीड गावाने गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनाच्या नियम व अटीचे ...

84 patients corona free in just 28 days | केवळ २८ दिवसात ८४ रुग्ण कोरोनामुक्त

केवळ २८ दिवसात ८४ रुग्ण कोरोनामुक्त

Next

पाच हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या व शूरवीरांचा वारसा लाभलेल्या तळबीड गावाने गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनाच्या नियम व अटीचे पालन करून कोरोनाला हद्दपार केले होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शर्थीचे प्रयत्न करूनही येथील दोनशेच्या आसपास ग्रामस्थांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी काहींना रुग्णालयात योग्य उपचार मिळाले नसल्याने व बेडअभावी आपला जीव गमवावा लागला. ग्रामस्थांना योग्य उपचार व बेडअभावी आपला जीव गमवावा लागत असल्याने तळबीडकर पुरतेच हादरून गेले होते.

दरम्यान, ‘आम्ही तळबीडकर’ या सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून गाव कोरोनामुक्त करण्याचा चंग ग्रामस्थांनी बांधला. त्यातून गावातील युवक व ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कसल्याही मदतीची वाट न पाहता गावातील जिल्हा परिषद शाळेत ५० बेडचे अद्ययावत चंद्रसेन महाराज नावाचे कोविड विलगीकरण कक्ष उभारले. समाजातील दानशूर व्यक्तींमुळे या चळवळीला मूर्त स्वरूप आले. आणि लोकसहभागातून अल्पावधीतच येथे चंद्रसेन महाराज विलगीकरण कक्षाची उभारणी झाली. या विलगीकरण कक्षातून गावातील रुग्णांना येथे विनामूल्य व दर्जेदार सेवा मिळू लागल्याने हा कक्ष गरजूंसाठी मायेचा व हक्काचा भक्कम आधार ठरला. ग्रामस्थांची येथे उपचारासाठी गर्दी होऊ लागली.

गत महिन्यात सुरू केलेल्या या कक्षातून २८ दिवसात ८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, विशेष म्हणजे या कक्षात उपचार घेणारा एकही रुग्ण दगावला नाही. येथील स्वयंसेवकांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे व कक्षातील चांगल्या सेवेमुळे तळबीड गावची सध्या कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.

- चौकट

तळबीड गाव कोरोनामुक्त करण्यासाठी डॉ. विक्रम अर्जुगडे, डॉ. श्रीकांत सूर्यवंशी, आरोग्यसेविका हेमलता कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते उमेश मोहिते, दुर्गेश मोहिते, अभिजित गायकवाड, चंद्रकांत चव्हाण, मिथुन शिंदे, सचिन शहा, मियाज मुलाणी, सागर शिवदास, विशाल मोहिते, अभय मोहिते, राजेंद्र गायकवाड, किशोर मोहिते, विनोद मोहिते आदींनी वैद्यकीय पथक व ग्रामस्थांच्या सहकार्यातून विशेष परिश्रम घेतले.

फोटो : २२केआरडी०८

कॅप्शन : तळबीड, ता. कऱ्हाड येथील विलगीकरण कक्षातून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: 84 patients corona free in just 28 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.