८४ पैशांसाठी ज्येष्ठ सातारकर ठोठावतोय दरवाजा!--लोकमत विशेष
By admin | Published: June 26, 2015 11:21 PM2015-06-26T23:21:56+5:302015-06-27T00:17:42+5:30
ग्राहक राजा : ‘बीएसएनएल’ बिलातील गोंधळावरून वरिष्ठांकडे दाद
जगदीश कोष्टी-सातारा -ग्राहकांची होणारी ही फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांना जागे करण्यासाठी शासन विविध पातळीवर जनजागृती करत असते. मात्र, शासनाकडूनच आपली फसवणूक होत आहे, असे वाटते तेव्हा करायचं काय? हा प्रश्न पडतो; पण सातारा येथील एका स्वाभिमानी ज्येष्ठ नागरिकाने अवघ्या ८४ पैशांसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला आहे, यासाठी वरिष्ठांकडे तक्रार दिली आहे.सुटे पैसे नाहीत म्हणून काही पैशांपासून दहा-वीस रुपयेही ‘जाऊ द्या’ म्हणणारे विक्रेते अन् ‘उदार’वादी होऊन सोडून देणारेही अनेकजण असतात. हॉटेलमध्ये जेवण केल्यावर सुटे दोन रुपये पाच रुपये टीप म्हणून देणे वेगळे अन् दहा-दहा रुपये सोडून देणे वेगळे. सुटे पैसे असले तरी विक्रेता किंवा शासकीय कर्मचारी सुटे नाहीत म्हटल्यावर उरलेले पैसे मागण्याचे धाडस दाखवत नाही. कुठं वाद घालायचा, हा विचार करून पैसे सोडून देतो; पण ही वृत्ती समाजासाठी घातक आहे.विसावा नाका परिसरात किरण कैलास नवगणे हे ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांचे पती एका खासगी कंपनीत निर्माता विभागातव्यवस्थापकपदी कार्यरत होते. त्यांना दूरध्वनी बिले व्यवस्थित येत होती; पण मे महिन्यात बिलात गोंधळ झाल्याचे लक्षात आले.नवगणे यांना एका बिलात ८२२.१६ रुपये बिल दाखविले होते. प्रत्यक्षात मात्र ८२३ रुपये आकारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या बिलात ७५७.२४ रुपये असताना ७५८ रुपये आकारून ते वसूलही करण्यात आले होते. यामुळे दोन रुपये जादा आकारणी करण्यात आली आहे, असा आरोप नवगणे यांचा आहे.यासंदर्भात किरण नवगणे यांनी ‘बीएसएनएल’च्या लेखाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, व्यवहार नियमांनुसार बिलांची रक्कम पूर्णांकात घेतली जाते. यामध्ये पन्नास पैशांहून कमी रक्कम असेल तर पुढील बिलात वसूल करावी. तसेच पन्नास पैशांहून अधिक रक्कम असेल तर एक रुपया आकारण्यात यावा. मात्र, दोन्ही बिलात पन्नास पैशांपेक्षा कमी रक्कम असताना एक-एक रुपया वसूल केला आहे. हे अन्यायकारक आहे. या संदर्भात मी सातारा येथील कार्यालयात संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठांकडे पाठवला आहे असे सांगत आहेत.
काही पैशांची रक्कम असली तरी तो व्यवहार आहे. यामुळे मी सातारा कार्यालयात २५ मे रोजी तक्रार केली आहे. या घटनेला एक महिना झाला तरी कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
- कैलास नवागणे