१९ ग्रामपंचायतींसाठी ८५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:28+5:302021-01-16T04:43:28+5:30
वाई : वाई तालुक्यातील १९ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असून, १५ जानेवारी रोजी ५७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. वाई तालुक्यात ...
वाई : वाई तालुक्यातील १९ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असून, १५ जानेवारी रोजी ५७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. वाई तालुक्यात सरासरी ८५ टक्के मतदान झाले. यामध्ये १४९ मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, नायब तहसीलदार गीतांजली गरड यांनी योग्य सूचना दिल्याने पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. तालुक्यातील संवेदनशील ग्रामपंचायतींत मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंबईतील चाकरमान्यांना मतदानासाठी सहज येता यावे यासाठी खास वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. वाई तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन स्थानिक गावपुढारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गावकी व भावकी व घराघरातील नातेसंबंधामध्ये कटुता येऊ नये व गावाची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी १९ ग्रामपंचायती बिनविरोध केल्या. ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी १४९ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. वाई तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींसाठी ६७ हजार ७१८ मतदार आहेत. त्यापैकी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४७ हजार ३६१ मतदारांनी हक्क बजावला. सायंकाळी साडेपाचपर्यंत अंदाजे ८५ टक्के मतदान झाले. मतदानानंतर सीलबंद मशीन पोलीस बंदोबस्तात रात्री दहापर्यंत वाई येथील नवीन तहसील कार्यालयात ठेवण्यात आल्या. त्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी संवेदनशील गावांत मतदानाच्या दिवशी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. प्रसंगी एस.आर.पी. ग्रुपची तुकडीही मागविण्यात आली होती, तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर कोरोनासंबंधी आरोग्य विभागाकडून खरबरदारी घेण्यासाठी मशीनच्या साहाय्याने चाचणी करण्यात आली. मतदारांनी मास्क लावूनच मतदान केले.
चौकट :
संवेदनशील गावांत जास्त मतदान
वाई तालुक्यातील बावधनमध्ये ८० टक्के, केंजळ ८० टक्के, ओझर्डेत ८६ टक्के, पसरणीत ७७ टक्के यासह दहा गावांमध्ये ८१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले.