खंडाळा तालुक्यातील ५० गावांत ८५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:57+5:302021-01-16T04:43:57+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सुमारे ८५.५३ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान खेड बुद्रूक, पिसाळवाडी, विंग, ...
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सुमारे ८५.५३ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान खेड बुद्रूक, पिसाळवाडी, विंग, बोरी या गावांतील मतदान यंत्रणा काहीकाळ बंद पडल्या होत्या. मात्र त्यानंतर मतदान सुरळीत होऊन ही प्रक्रिया शांततेत पार पडली.
खंडाळा तालुक्यातील ५० गावामधील १३८ मतदान केंद्रावर शुक्रवारी सकाळपासून मतदानास सुरुवात झाली. सकाळपासूनच गावागावात मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती. निवडणूक निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी संजय असवले, निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार दशरथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानप्रक्रिया सुरळीत सुरू होती.
तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींची निवडणूकप्रक्रिया जाहीर झाली होती. त्यामध्ये पळशी, कराडवाडी, वाण्याचीवाडी, लिंबाचीवाडी, हरळी, कान्हवडी, घाडगेवाडी या सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या, तर विविध ग्रामपंचायतीत १३१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
५० ग्रामपंचायतीच्या ३२० जागांसाठी ६९८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काही गावांत किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडत होते. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी ३२ हजार ४९० महिला व ३३ हजार ९२३ पुरुष असे ६६ हजार ४१३ मतदार मतदानास पात्र होते. त्यापैकी ५६ हजार ८०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदानप्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, शिरवळचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे, लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.