९१ हजार टीव्ही बंद!
By admin | Published: January 3, 2016 12:47 AM2016-01-03T00:47:25+5:302016-01-03T00:48:13+5:30
जिल्ह्यातील ‘सेटटॉप’ साठा संपला : बावीस गावांतील ३२ हजार २७० बॉक्स बसविले
सातारा : जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील बावीस गावांमध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, आत्तापर्यंत ३२ हजार २७० घरांमध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही ८० टक्के सेटटॉप बॉक्स न बसविल्यामुळे तब्बल ९१ हजार ५९२ घरांमधील टीव्हीवर ‘मुंगी डान्स’ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे साताऱ्यातही सेटटॉप बॉक्स बसविणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार १ जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्येच सेटटॉप बॉक्स बसविणे बंधनकारक केले आहे. ३१ डिसेंबर २०१५ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र अनेकांनी सेटटॉप बॉक्स बसविलेच नाहीत. त्यामुळे केबल सर्व्हिस खंडित करण्यात आली आहे. सेटटॉप बॉक्स खेरेदीबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. काही ठिकाणी खासगी दुकानांमध्ये हे सेटटॉप बॉक्स विकत मिळतात, अशी अफवा पसरवली गेल्यामुळे नागरिक निर्धास्त होते; परंतु हे सेटटॉप बॉक्स केबल चालकांनी खरेदी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आले आहे. मात्र केबल चालकांकडेच सेटटॉप बॉक्सचा साठा संपल्यामुळे नागरिकांना ‘मुंगी डान्स’ अजून किती दिवस पाहावा लागणार, याबाबत कोणाकडेच ठोस माहिती नाही.
ज्या लोकांनी सेटटॉप बॉक्स बसविले नाहीत. तरीही त्यांच्या टीव्ही सुरू असतील तर प्रांताधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. सेटटॉप बॉक्स संदर्भात तहसीलदारांना अधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. अनेक लोकांना सेटटॉप बॉक्सबाबत माहिती मिळत नसल्याने नाराजी पसरत आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करमणूक विभागामध्ये केवळ चार कर्मचारी असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे नेटवर्क सांभाळणे कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. पुढच्या डिसेंबरपर्यंत तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण जिल्ह्यात सेटटॉप बॉक्स सक्तीचा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)