९१० उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात
By admin | Published: July 26, 2015 10:00 PM2015-07-26T22:00:25+5:302015-07-27T00:22:22+5:30
माण तालुका : ५२ ग्रामपंचायतींतील केवळ ८२ जागा बिनविरोध करण्यात यश
सचिन मंगरुळे - म्हसवड -माण तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर विविध ग्रामपंचायतींत ८२ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या ४९९ जागांसाठी ९१० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बहुतेक ठिकाणी दुरंगी लढती होणार आहेत.दहिवडी गोंदवले बु्र, गोंदवले खुर्द, पिंगळी खुर्द या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीच्या दुरंगी लढती होणार आहेत. तर बिनविरोध झालेल्या पाच ग्रामपंचायतींपैकी लोधवडे व दिवडी ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी देण्यात आल्याने ग्रामपंचायतीवर खऱ्या अर्थाने महिलाराज चालणार आहे.माण तालुक्यात कोणतीही निवडणूक असो, ती अटीतटीची होत असते. जिल्हा बँक निवडणुकीत झालेला संघर्ष पाहता याही निवडणुकीत संघर्ष पाहायला मिळणार आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक एक तर एकमेकांचे दोस्त एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने या ग्रामपंचायती निवडणुका रंगतदार होणार आहेत. सध्या ग्रामपंचायतनिवडणुकीमध्ये प्रमथमच युवकांचा समावेश मोठ्या प्रमणावर दिसून येत आहे. युवकांनी राजकारणात येऊन आपल्या गावचा व परिसराचा विकास करून आर्दश गाव निर्माण करण्यासाठी तालुक्यातील अनेक गावांचा जलसंधारणाचा माध्यामातून विकास करून आर्दश निर्माण केला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये युवा वर्गाचा समावेश व गावाचा कारभार आपण करू शकतो, हा आत्मविश्वास आलेला दिसून येत आहे.तालुक्यातील नेतेमंडळींनी ग्रामपंचायतीवर लक्ष केंद्रित केले असून, स्थानिक गाव पुढाऱ्यांनी आपापल्या सोयीनुसार तडजोडी करून पॅनेल तयार केले आहेत. ग्रामपंयायत निवडणुकांना आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, मतदानाच्या दिवसापर्यंत यात भावभावकीचे, जातीपातीचे तसेच राजकीय कुरघोड्यांचे रंग भरले जाणार आहेत.