मतदानासाठी जिल्ह्यात ९३० बसेस
By admin | Published: October 12, 2014 12:42 AM2014-10-12T00:42:30+5:302014-10-12T00:42:30+5:30
विधानसभा निवडणूक : जिल्हा निवडणूक कार्यालयाने तीन दिवसांसाठी केली गाड्यांची नोंद
सातारा : लोकसभा, विधानसभा निवडणुका म्हणजे जणू लोकशाहीचा उत्सवच असतो. राज्याच्या कारभाराची चावी ज्यांच्या हाती देणार आहेत, तो मतदानाचा दिवस निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या मागणीनुसार तीन दिवसांत ९३० एसटी गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवार, दि. १५ रोजी मतदान होत आहे. पण, ही प्रक्रिया शासकीय पातळीवर तीन दिवस चालणार आहे. निवडणुकीचे साहित्य महाबळेश्वर, पाटण, जावळी खोऱ्यातून दुर्गम भागात पोहोचविण्याचे काम आजवर एसटीने चोखपणे पार पाडले आहे. निवडणूक कार्यालयाने केलेल्या मागणीनुसार एसटी पुरवण्यात येणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी दिली.
सोमवार, दि. १३ रोजी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाच्या ठिकाणी सोडण्यासाठी जिल्ह्यात अडीचशे गाड्या वापरण्यात येणार आहेत. यामध्ये सातारा ४४, कऱ्हाड ४५, फलटण ३९, वाई ४७, दहिवडी ४५, पाटण येथे ३० गाड्या वापरण्यात येणार आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी मंगळवार, दि. १४ रोजी निवडणूक कर्मचारी व मतदान यंत्रणा मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी व पुन्हा मतदानानंतर मतदान साहित्य तालुक्याच्या ठिकाणी पोहोच करण्यासाठी दररोज ३४० असे ६८० गाड्यांचा वापर केला जाणार आहे. यामध्ये सातारा ३१, कऱ्हाड ८३, कोरेगाव ४५, फलटण ४२, पाटण ४१, वाई ५८, दहिवडीतून ४१ गाड्यांचा समावेश आहे. कोयना जलाशयाच्या पलीकडे व नदीच्या पलीकडील भागात साहित्य पोहोचविण्यासाठी बोटींचाही वापर केला जाणार आहे.
दरम्यान, मतदानानंतर सायंकाळी कर्मचारी व साहित्य घेऊन एसटी गाड्या संबंधित तहसील कार्यालयात जाणार आहेत. त्यानंतर साहित्य जमा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू शकते. त्यानंतर कर्मचाऱ्यांना स्वत:च्या गावी जाताना अडचणी येणार आहेत. कारण, निवडणूक कर्मचारी विविध भागांतील असणार आहेत. आणि रात्री उशिरानंतर त्यांना सोय होणार नाही, त्यामुळे योग्य ती सोय करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)