सोळशीच्या शनैश्वर देवस्थानचा ९ कोटींचा विकास आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:43 AM2021-08-21T04:43:43+5:302021-08-21T04:43:43+5:30
पिंपोडे बुद्रुक : ‘कोरेगाव तालुक्यातील श्री सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा ८ कोटी ९४ लाखांचा विकास ...
पिंपोडे बुद्रुक : ‘कोरेगाव तालुक्यातील श्री सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा ८ कोटी ९४ लाखांचा विकास आराखडा सातारा जिल्हा परिषदेने तयार केला आहे. तीर्थक्षेत्रासाठी निधीचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात आला असून, लवकरच तो मिळणार आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी समितीचे सभापती मंगेश धुमाळ यांनी दिली.
सभापती धुमाळ म्हणाले, ‘कोरेगाव-वाई-खंडाळा तालुक्याच्या सीमेवर सोळशी येथे श्री सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान आहे. या देवस्थानास शासनाने ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अनेक कामे मार्गी लागली आहेत. दर शनिवारी याठिकाणी भक्तांचा मेळा भरत असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. शनैश्वर मंदिर व परिसरात भाविकांसाठी सोईसुविधा निर्माण व्हाव्यात, अशी मागणी मठाधिपती नंदगिरी महाराज, मुंबई बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळस्कर, प्रमोद सोळस्कर यांची होती. त्यानुसार, सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत या ठिकाणी भक्तनिवास इमारत बांधण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. यासाठी ८ कोटी ९४ लाख रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.’
‘सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यामार्फत शनैश्वर देवस्थानच्या निधीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून हा निधी लवकरच मिळेल. यामुळे शनिभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शनैश्वर देवस्थान परिसरात मूलभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत. आगामी काळातही भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे,’ असेही सभापती धुमाळ यांनी स्पष्ट केले.
कोट :
सोळशी येथील शनैश्वर देवस्थानचा कायापालट मठाधिपती नंदगिरी महाराज यांच्या माध्यतातून होत आहे. या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्याने निवासाची गैरसोय होत होती. नंदगिरी महाराज यांची याबाबत मागणी होती. त्यानुसार, भक्तनिवासासाठी शासनाकडे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधीचा प्रस्ताव पाठविला आहे.
- मंगेश धुमाळ, कृषी सभापती