कोरेगाव शहरात ‘क्रेन’वाल्यांकडून नऊ महिन्यात नऊ लाखांचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2016 10:55 PM2016-02-15T22:55:06+5:302016-02-16T00:01:53+5:30

वाहतूक शाखा : बेशिस्त नागरिकांनी घेतला धसका; कारवाई सुरूच राहणार

9 lakh penalty for nine months in Kreenga city | कोरेगाव शहरात ‘क्रेन’वाल्यांकडून नऊ महिन्यात नऊ लाखांचा दंड!

कोरेगाव शहरात ‘क्रेन’वाल्यांकडून नऊ महिन्यात नऊ लाखांचा दंड!

Next

साहिल शहा -- कोरेगाव शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रकाश धस व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केलेल्या सम-विषम पार्किंग आणि क्रेन सर्व्हिसचा मोठा फायदा नऊ महिन्यांनी दिसू लागला आहे. ८ हजार ७३४ वाहनांवर कारवाई करण्यात आलेली असून, त्या माध्यमातून ८ लाख ७५ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दि. २५ फेब्रुवारी २०१४ मध्ये पोलीस निरीक्षकपदाची सुत्रे प्रकाश धस यांनी स्वीकारली. त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच शहरातील वाहतुकीचा जटील प्रश्न सर्वोच्च प्राधान्य दिले. आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह नगरविकास कृती समितीने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. पोलीस दलाने स्थानिक स्वराज्य संस्थेकडे यासंदर्भात सहकार्याची विनंती केली होती. पोलीसमित्र मधुकर शेंबडे यांनीही सहकार्य केल्याने कोरेगावातील वाहतूक व्यवस्थेच्या आराखड्याला मूर्त स्वरुप आले होते. एप्रिल २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात अधिसूचना प्रसिध्द करुन हरकती मागविण्यात आल्या होत्या. स्थानिक लोकांनी सूचविलेले बदल करुन प्रशासन-पोलीस-नागरिक असे एकत्र आले आणि मे २०१५ पासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर सम-विषम पार्किंग आणि क्रेन सर्व्हिस सुरु करण्यात आली.
सुरुवातीला वाद-विवाद घडू लागले, मात्र कायदा व व्यवहार यांची सांगड घालून कारवाई सुरुच ठेवण्यात आली. आता तालुक्यातील वाहनधारकांना वाहतुकीची शिस्त लागल्याने कारवाईची संख्या घटत आहे. मे २०१५ या महिन्यात सर्वाधिक १७९१ वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात आला तर सर्वात कमी नोव्हेंबर २०१५ मध्ये ६७३ वाहनधारकांवर कारवाई झाली.
वाहतूक शाखेचे हवालदार महादेव खुडे, पोलीसनाईक प्रवीण चव्हाण, गोरखनाथ साळुंखे, रामराव गायकवाड, दत्तात्रय तायशेटे, जयवंत शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


नो-पार्किंग केसेस
महिना केसेस दंड रक्कम
मे १७९१ १,७९,४०० रुपये
जून १३४५ १,३४,५०० रुपये
जुलै १०८९ १,0९,४०० रुपये
आॅगस्ट ८६१ ८६,३०० रुपये
सप्टेंबर ७४७ ७५,000 रुपये
आॅक्टोबर ७४० ७४,१०० रुपये
नोव्हेंबर ६७३ ६७,३०० रुपये
डिसेंबर ७९२ ७९,७०० रुपये
जानेवारी ६९६ ६९,६०० रुपये

वाहतूक व्यवस्था सुरळीत करणारच
शहरातील वाहतूक व्यवस्था याविषयी ‘लोकमत’शी बोलताना पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी आम्ही कारवाई सुरुच ठेवणार असून, वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधून अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार आहोत. येत्या काही दिवसांत शहरातील रस्ते मोकळा श्वास घेऊ शकतील. त्यानंतर वाहतूक आराखड्यातील तरतुदीनुसार बदल केले जातील.
- प्रकाश धस, पोलीस निरीक्षक, कोरेगाव

Web Title: 9 lakh penalty for nine months in Kreenga city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.