शेअर मार्केटच्या आमिषाने ९ लाखांना गंडा
By दत्ता यादव | Published: July 3, 2024 08:38 PM2024-07-03T20:38:46+5:302024-07-03T20:39:10+5:30
महिलेसह दोघांवर गुन्हा; पाच जणांची फसवणूक
दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्त फायदा मिळवून देण्याच्या अमिषाने पाच जणांची ९ लाख ४८ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सैफ अहमद नसुरुद्दीन शेख, सुषमा भानुदास जाधव (रा. रामराव पवारनगर, गोडोली, सातारा), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत संतोष बबनराव शिंदे (वय ३९, रा. दिव्यनगरी, अंबेदरे, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. ओळख झाल्यानंतर संशयित दोघांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जास्त फायदा मिळवून देतो, असे शिंदे यांना सांगितले. एवढेच नव्हे तर शिंदे यांचा विश्वास बसण्यासाठी पैसे गुंतवल्यावर कसा परतावा मिळतो, याचे खोटे पत्रक दाखवले. तसेच शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी करारनामाही करून दिला. त्यामुळे संतोष शिंदे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यांनी स्वत:चे काही पैसे त्यांच्याकडे गुंतवले.
तसेच त्यांची बहीण ज्योती पवार, मेहुणे तुषार कदम, मित्र अनिकेत साळुंखे, शिवराज टोणपे यांच्यासह अन्य काही जणांची संशयितांनी ९ लाख ४८ हजारांची फसवणूक केली. अशाच पद्धतीने आणखी काही जणांची संशयितांनी फसवणूक केल्याचे संतोष शिंदे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक चौधरी हे अधिक तपास करीत आहेत.