दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, नऊ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:12 PM2019-07-27T12:12:32+5:302019-07-27T12:16:02+5:30
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करुन दोन युवकांसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली. या चोरट्यांकडून चोरीच्या तब्बल नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दुचाकींची किंमत १ लाख ६३ हजार इतकी आहे.
सातारा : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करुन दोन युवकांसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली. या चोरट्यांकडून चोरीच्या तब्बल नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दुचाकींची किंमत १ लाख ६३ हजार इतकी आहे.
विकास मुरलीधर मुळे (वय १९, रा.पावर हाउस झोपडपट्टी, मंगळवार पेठ, सातारा), बाळा उर्फ सुरज किसन सकटे (वय २२, रा.सातारा रोड ता.कोरेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.
त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अशा घटनांना आळा घालण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शाहूुपरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जोरदार मोहीम हाती घेतली होती.
याच दरम्यान साताऱ्यातील एका युवतीने पोलिसांना संशयितांची माहिती दिली होती. पोलीस संशयितांचा शोध घेत असताना ते राजवाडा येथे दुचाकीवर आढळले. पोलिसांनी थांबण्यासाठी सांगितल्यानंतर ते दुचाकीवरुन पळून जाऊ लागले.
पोलिसांनी संशयितांचा थरारक पाठलाग करुन तिघांना पकडले. दुचाकीबाबत विचारले असता, ते निरूत्तर झाले. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातून तब्बल ९ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व दुचाकी त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत.
पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, हवालदार लैलेश फडतरे, अमीत माने, अधिकराव खरमाटे, सचिन माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, मोहन वाघमळे, अमर काशीद, मिना गाढवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
मौजमस्तीसाठी चोरी..
अटक केलेल्या संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित तिघे चोरटे केवळ मौजमस्तीसाठी दुचाकी चोरत होते. वेगवेगळ्या गाड्या चोरून त्या चालविण्याची हौस भागवत होते. त्यांच्याकडे नेहमी नवीन दुचाकी असायची. याची शंका एका युवतीला आल्याने तीने हा प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. तेंव्हा या टोळीचे बिंग बाहेर पडले.