रहिमतपुरात अबतक ९० इमारती धोकादायक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:26 AM2021-07-21T04:26:13+5:302021-07-21T04:26:13+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपरिषद हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या नव्वदवर पोहोचली आहे. पालिका प्रशासनाने सर्व्हे करून धोकादायक मिळकतदारांना ...
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपरिषद हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या नव्वदवर पोहोचली आहे. पालिका प्रशासनाने सर्व्हे करून धोकादायक मिळकतदारांना नोटिसा बजावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
रहिमतपूर शहराचा गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर सर्वांगीण विकास झाला आहे. पालिका हद्दीत अनेक नवीन इमारतींची भर पडली आहे. याबरोबरच सध्या नवीन इमारतींची कामे गतीने सुरू आहेत. मात्र अनेक वर्षांच्या जुन्या घरांची पडझड सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. अर्धवट पडझड झालेल्या घरांच्या भिंती पावसामुळे कोसळण्याची शक्यता आहे. या पडझडीत त्या घरात वास्तव्याला असलेल्या नागरिकांबरोबरच शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला आहे. धोकादायक घरांच्या पडझडीमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी नगरपालिकेच्या वतीने धोकादायक असलेल्या इमारतींचा सर्व्हे करण्यात आला आहे. धोकादायक घरात वास्तव्य करणाऱ्या मिळकतदारांना नोटिसा बजावून पर्यायी ठिकाणी स्थलांतर करण्याची सूचना केली जाणार आहे. पावसामुळे दुर्घटना घडल्यास संभावित नुकसानीला मिळकतदार जबाबदार राहणार आहेत. त्यामुळे मिळकतदारांनी पर्यायी जागेत तत्काळ स्थलांतर करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून केले आहे.
चौकट
स्वत:सोबत शेजाऱ्यांचा जीव वाचवा
धोकादायक घरात राहणाऱ्या बहुतांशी मिळकतदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु ‘जान है तो जहान है’ त्यामुळे नागरिकांनी धोकादायक घरात न राहता पर्यायी व्यवस्था करून स्वत:सह शेजाऱ्यांचा जीव वाचवावा, असे आवाहन नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी केले आहे.
फोटो :
२०रहिमतपूर-बिल्डिंग
रहिमतपूर शहरात धोकादायक इमारती उभ्या आहेत. (छाया : जयदीप जाधव)