मायणी, जोर-जांभळी संवर्धन राखीवसाठी ९० लाख मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:27+5:302021-07-01T04:26:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : फ्लेमिंगो पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेला मायणी परिसर व कोल्हे-रानकुत्री टोळ्यांच्या अस्तित्वामुळे आकर्षण केंद्र असलेल्या जोर-जांभळीच्या ...

90 lakh sanctioned for Mayani, Purple Conservation Reserve | मायणी, जोर-जांभळी संवर्धन राखीवसाठी ९० लाख मंजूर

मायणी, जोर-जांभळी संवर्धन राखीवसाठी ९० लाख मंजूर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : फ्लेमिंगो पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेला मायणी परिसर व कोल्हे-रानकुत्री टोळ्यांच्या अस्तित्वामुळे आकर्षण केंद्र असलेल्या जोर-जांभळीच्या (ता. वाई) या दोन नव्याने मंजूर झालेल्या संवर्धन राखीव वनक्षेत्राच्या विकासासाठी तब्बल ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी याबाबतची माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली. डिसेंबर २०२० मध्ये सातारा जिल्ह्यातील मायणी तलावासह येराळवाडी, कानकात्रे व सूर्याचीवाडी तलाव या क्षेत्रास समूह पक्षी संवर्धन राखीव, तर वाई तालुक्यातील जोर व जांभळीच्या खोऱ्यास ‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’चा दर्जा बहाल करण्यात आला आहे.

यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना महादेव मोहिते यांनी सांगितले की, ‘सुमारे ६ हजार ५११ हेक्टरचे जोर-जांभळी क्षेत्र, तर साताऱ्यातील पक्षी अधिवासाकरिता महत्त्वाच्या असणाऱ्या ‘मायणी’ वनक्षेत्रालाही (८६६ हेक्टर) संवर्धन राखीवचा दर्जा यापूर्वीच मिळाला आहे. जोर-जांभळीकरिता ७० लाख, तर मायणीकरिता २० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. संवर्धन राखीवचा दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाने निधीची तरतूद केली आहे. या दोन्ही ठिकाणचा संवर्धन आराखडा तयार केला जाईल. त्यानुसार दोन्ही क्षेत्रांत कामे केली जातील.’

जोर-जांभळीला पर्यटक तसेच प्राणी अभ्यासक यावेत, तसेच मायणीला पक्षीप्रेमी यावेत, यासाठी प्रचार-प्रसिद्धी, पाणवठ्यांची निर्मिती व विकास, मचाण-निरीक्षण मनोरे, कॅमेरा ट्रॉप, संरक्षण कुटी, प्राण्यांसाठी कुरण विकास आदी विविध कामांचा संवर्धन आराखड्यात समावेश असेल. या कामांमुळे पशुपक्ष्यांना अनुकूल अधिवास निर्माण करण्यात येईल. त्यामुळे पर्यटक व अभ्यासकांचीही चांगली सोय होईल, असा विश्वासही मोहिते यांनी व्यक्त केला.

व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे या संवर्धन राखीवची कार्यपद्धती असते. मायणी व जोर-जांभळीसाठी एकूण दोन वनपाल आणि ६ वनरक्षक असे मनुष्यबळ मंजुरीनंतर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चौकट ...

काय आहे जोर-जांभळी अन् मायणीत

- वाईपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर, सातारा-पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर जोर व जांभळीचे खोरे आहे. या भागात वन्य प्राणी भरपूर आहेत. बिबट्या, अस्वलांसह विशेषत: रानकुत्र्यांची संख्या अधिक आहे.

- नव्या मायणी समूह पक्षी संवर्धन राखीवमध्ये परदेशी स्थलांतरित पक्ष्यांसह अनेक प्रकारच्या स्थानिक व आंतरभारतीय स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे आश्रयस्थान संवर्धित होईल.

- अमेरिकेतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणारे ग्रेटर फ्लेमिंगो, लेसर फ्लेमिंगो यास स्थानिक चित्रबलाक, कॉमन टील, कॉम्ब डक, कॉमन कुट ही बदके, ओपनबिल स्टॉर्क, स्पूनबिल यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे करकोंचे-बगळे यांचा मायणी परिसरात अधिवास आहे.

कोट ...

जोर-जांभळी आणि मायणी समूह पक्षीसंवर्धन राखीव या क्षेत्राला विशेष दर्जा मिळाल्यानंतर अवघ्या तीन ते सहा महिन्यांत मोठा निधी उपलब्ध झाला, याचे समाधान आहे. यातून वन्यजीव तसेच पशु-पक्ष्यांसाठी पाणवठे, चराऊ कुरण आदी मूलभूत गोष्टींचा विकास होईल. त्याचबरोबर या क्षेत्राच्या संरक्षणासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास वाटतो.

- सुधीर सुकाळे, अध्यक्ष, ड्रोंगो निसर्ग संस्था

_____________

कोट २

आत्ता मंजूर झालेला निधी हा तातडीचा पहिला टप्पा आहे. यानंतरही गरजेनुसार शासनाकडून तेथील विकासासाठी वेळोवेळी निधी दिला जाईल. या संवर्धन राखीव क्षेत्रांच्या मजबुतीकरणासाठी या निधीचा मोठा उपयोग होईल.

- महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, सातारा

____________________

Web Title: 90 lakh sanctioned for Mayani, Purple Conservation Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.