कोयना नव्वदी पार, धरण भरण्यासाठी हवे १५ टीएमसी; सातारा जिल्ह्यात पावसाची विश्रांती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 12:02 PM2024-08-13T12:02:08+5:302024-08-13T12:02:24+5:30
२४ तासांत नवजालाच १९ मिलिमीटर पाऊस
सातारा : जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाची विश्रांती असून, २४ तासांत नवजा येथेच सर्वाधिक १९ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे धरणातील पाण्याची आवकही घटली आहे. तरीही कोयना धरणातील पाणीसाठ्याने ९० टीएमसीचा टप्पा पार केला आहे. धरण भरण्यासाठी अजून १५ टीएमसी पाण्याची गरज आहे.
जिल्ह्यात जून महिन्यात चांगला पाऊस झाला हाेता. त्यामुळे पश्चिम भागातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरणात पाणी येण्यास सुरुवात झालेली. मात्र, मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला नव्हता. तर पूर्व भागात दमदार पाऊस झाल्याने छोट्या प्रकल्पात पाणीसाठा वाढला होता. यामुळे दुष्काळाची स्थिती निवळली. पण, जुलै महिना उजाडल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. जुलैच्या मध्यावर सुरू झालेला पाऊस महिना संपेपर्यंत सुरूच होता. या काळात पश्चिमेकडील सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यात अतिवृष्टी होती.
जवळपास १२ दिवस पावसाने झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच या अतिवृष्टीमुळे छोटे पाणी प्रकल्प भरून वाहिले. तर कोयनेसह प्रमुख मोठ्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. परिणामी कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही धरणे ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान भरली आहेत. त्यामुळे धरणाबद्दलची चिंता कमी झाली आहे. अजूनही पावसाचा दीड महिना बाकी आहे. त्यामुळे धरणे भरू शकतात. पण, ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाची उघडीप आहे.
जिल्ह्यात मागील १२ दिवसात कमी पाऊस झाला आहे. मागील चार दिवसांपासून तर उघडीप आहे. पश्चिम भागातच तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९, नवजाला १९ आणि महाबळेश्वरमध्ये १४ मिलिमीटर पर्जन्यमनाची नोंद झाली आहे. पाऊस कमी झाल्याने कोयना धरणातही सावकाश आवक आहे. सकाळच्या सुमारास सुमारे साडेसात हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील पाणीसाठा ९०.१४ टीएमसी झाला आहे. पाऊस कमी झाल्यापासून कोयनेतील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
नवजाला ५,०७४ मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. १ जूनपासून नवजा येथे ५ हजार ७४ मिलिमीटरची नोंद झाली, तर कोयनानगरला ४ हजार २८० आणि महाबळेश्वरमध्ये ४ हजार ८३६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे यावर्षी नवजाचा पाऊस सहा हजारांपर्यंत, तर महाबळेश्वरला पाच हजार मिलिमीटरचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.