जिल्ह्यात ज्वारीची ९१ तर गहू, हरभरा पेर ७७ टक्के..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 05:05 PM2020-12-11T17:05:34+5:302020-12-11T17:08:00+5:30
Agriculture Sector, Farmar, Sataranews सातारा जिल्ह्यातील रब्बी हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ८५ टक्के क्षेत्रावर पीक घेण्यात आले आहे. तर ज्वारीची ९१, गहू आणि हरभऱ्याची पेरणी ७७ टक्क्यांवर झाली आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ८७ हजार हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. दरम्यान, चांगल्या पावसामुळे पाणी उपलब्ध असून पिकेही चांगल्या स्थितीत आहेत.
सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ८५ टक्के क्षेत्रावर पीक घेण्यात आले आहे. तर ज्वारीची ९१, गहू आणि हरभऱ्याची पेरणी ७७ टक्क्यांवर झाली आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ८७ हजार हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. दरम्यान, चांगल्या पावसामुळे पाणी उपलब्ध असून पिकेही चांगल्या स्थितीत आहेत.
जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १९ हजार ११९ आहे. यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक १ लाख ३९ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. यानंतर गहू क्षेत्र ३४ हजार ९७३, मका १२ हजार १७७ तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४८९ हेक्टर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात करडई, सूर्यफूल, तीळ, जवस पीकही अत्यल्प क्षेत्रात घेण्यात येते.
मागील दोन महिन्यांपासून रब्बी हंगामातील पेरणीस सुरुवात झाली. पण, दोनवेळा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणीला ब्रेक लागला होता. तर काही ठिकाणी आगाप पेरणी केलेल्या ज्वारी पिकाचे नुकसान झाले होते. परिणामी अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. असे असलेतरी सद्य:स्थितीत जिल्ह्यात ज्वारीची सर्वाधिक १ लाख २६ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ९०.७७ आहे.
जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र माण तालुक्यात ३२ हजार ५४५ हेक्टर असून, त्यानंतर फलटणला २१ हजार ५६४ आणि खटावला २० हजार ८५५ हेक्टर आहे. तसेच कोरेगाव, खंडाळा, वाई, कऱ्हाड, सातारा, जावळी या तालुक्यांतही ज्वारीचे क्षेत्र आहे.
आतापर्यंत गव्हाची जवळपास २७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर मकेची ४ हजार ४६७ आणि हरभऱ्याची २३ हजार ७१२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाची सर्वाधिक पेरणी कऱ्हाड तालुक्यात ४ हजार ५०५ आणि त्यानंतर फलटणमध्ये ४ हजार २३७ हेक्टरवर झालेली आहे. मका पीकही अनेक तालुक्यांत घेण्यात आलेले आहे.
माणमध्ये ९९, वाई अन् कोरेगावला ९० टक्क्यांवर पेरणी पूर्णत्वास...
जिल्ह्यात रब्बीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र हे माण तालुक्यात ३९ हजार ८१६ हेक्टर आहे. त्यानंतर फलटणला ३३ हजार, खटाव ३० हजार ११६, कोरेगाव २३ हजार ३३७, सातारा २० हजार ९४९, खंडाळा १८ हजार १७५, कऱ्हाड १५ हजार ४८७, वाई तालुका १५ हजार १५८, पाटण १३ हजार, जावळी ९ हजार ३०७ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६९८ हेक्टर आहे.
आतापर्यंत सर्वाधिक पेरणी माण तालुक्यात ९९.२२ टक्के झाली आहे. तर पेरणी क्षेत्र ३९ हजार ५०६ हेक्टर झाले आहे. त्यानंतर खटावमध्ये ८९.६५ टक्के झाली आहे. तर फलटण ७२.१९, सातारा तालुका ७६.६३, वाई ९१.६५, कऱ्हाड तालुक्यात ७७.३१, पाटण ८२, जावळी तालुका ७९ आणि कोरेगावमध्ये ९०.८३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्णत्वास गेलेली आहे.