जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली, ९२५ लोक बाधित; रुग्ण वाढीचा दर तब्बल १८.०६ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 02:02 PM2022-01-13T14:02:52+5:302022-01-13T14:03:30+5:30
कोरोना रुग्ण वाढीचा दर तब्बल १८.०६ टक्के इतका. रुग्ण वाढ ही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय बनली आहे.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आज, गुरुवारी ९२५ लोक बाधित आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या या वाढत्या संख्येमुळे तिसऱ्या लाटेची भिती वाढली आहे.
आरोग्य विभागाने कोरोना चाचण्या करण्यावर भर दिला आहे. जेवढ्या जास्तीत जास्त कोरोना चाचण्या केल्या तर लवकरात लवकर रुग्ण सापडतील आणि त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार करून त्यांना कोरोना मुक्त करता येईल, असे प्रयत्न आरोग्य यंत्रणेने सुरू ठेवले आहेत. बुधवारी ५ हजार १२२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्या चाचण्यांमधून ९२५ कोरोना बाधित आढळून आले आहेत.
कोरोनाचा रुग्ण वाढीचा दर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सलगपणे रुग्ण वाढीचा दर हा पंधरा टक्क्यांच्या वर आहे. तर गुरुवारी तब्बल १८.०६ टक्के इतका कोरोना रुग्ण वाढीचा दर वाढला. रुग्ण वाढ ही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय ठरलेली आहे.
जिल्हा प्रशासनाने लोकांच्या लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वय वर्ष १५ ते १८ या वयोगटात असणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना लसींचा डोस दिला जातोय. याबरोबरच ज्येष्ठांना १०० टक्के लसीकरण करण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरू ठेवले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी ज्यांचे लसीचे दोन डोस झालेले आहेत, त्यांना त्रास कमी होणार आहे, हे अभ्यासांती स्पष्ट झालेले आहे.
मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या महानगरांमध्ये रुग्ण वाढ झाली, मात्र ज्यांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे, अशा लोकांना कमी त्रास झाला; परंतु ज्यांनी लसीकरण केले नाही अशा ९६ टक्के लोकांना ऑक्सिजन बेड शिवाय पर्याय नव्हता. या परिस्थितीमध्ये जीव वाचवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय ठरणार आहे.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने आरोग्य सेवा सज्ज ठेवलेली आहे. अद्यापही गृह विलगीकरण तसेच संस्थात्मक विलगीकरण कक्षांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शासनाच्या कोविड सेंटर्समध्ये अद्याप व्याधीग्रस्त रुग्ण दाखल झालेले नाहीत. मात्र रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड सज्ज ठेवावे लागणार आहेत.