घरकूल योजनेचे ९५ लाख गेले परत
By admin | Published: July 2, 2016 11:55 PM2016-07-02T23:55:03+5:302016-07-02T23:55:03+5:30
पाटण पंचायत समिती : पहिला हप्ता घेऊन गायब लाभार्थ्यांचा शोध घेण्याची मागणी
पाटण : ‘तालुक्यातील घरकूल योजनेसाठी २०१२ पासून मंजूर झालेले तब्बल ९५ लाख रुपये घरकुलाची कामे अपूर्ण राहिल्याने परत गेले. याला जबाबदार कोण?, घरकुलाचा पहिला हप्ता घेऊन फक्त पाया खोदून गायब झालेल्या लाभार्थ्यांचा शोध घ्या. त्यांच्याकडून पैशांची वसुली करा,’ अशी मागणी पंचायत समिती सदस्य रामभाऊ लाहोटी यांनी केली.
सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पाटण पंचायत समितीची मासिक सभा शनिवारी पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
‘गटशिक्षणाधिकारी नितीन जगताप यांनी शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यात फेरफार केला आणि सभागृहाला उत्तर द्यावे लागेल म्हणून ते पळून गेले आहेत,’ असा आरोप उपसभापती डी. आर. पाटील यांनी केला. ‘शिक्षक संघटनांच्या दबावाखाली शिक्षण विभाग वागतोय, हे चुकीचे आहे,’ असे लाहोटी यांनी सांगितले. तर ‘त्या सहा शिक्षकांना परत मुळ शाळेवर जाऊ द्या, प्रशासकीय बदल्यांमध्ये बदल करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या अगोदर सह्या घेतल्या आहेत,’ असा आरोप सदस्य नथूराम कुंभार यांनी केला. तालुक्यातील ३३ शिक्षक बदलून गेले. त्या बदल्यात तीन शिक्षक आले आहेत.
‘२१ ठिकाणी कूपनलिका खोदली नाही. त्यामुळे प्रत्येकी साठ हजार रुपये असे तेरा लाख रुपये परत गेले,’ असा आरोप राजाभाऊ शेलार यांनी केला. (प्रतिनिधी)
महिला कर्मचाऱ्यांची
आकसातून बदली
पशुवैद्यकीय विभागातील महिला कर्मचारी गायकवाड यांची गटविकास अधिकाऱ्यांनी वैयक्तिक आकसापोटी बदली केली आहे. त्या महिला कर्मचाऱ्यास केरळ येथे पाठविले आहे, असा आरोप रघुनाथ माटेकर यांनी केला. त्यावर खडाजंगी होऊन त्या महिला कर्मचाऱ्यास पाटण शहराच्या नजीक कामाचे ठिकाण देण्यात येईल, अशी ग्वाही गटविकास अधिकारी के. एस. गौतम यांनी दिली.
उपसरपंचाच्या उचापती..
‘मणेरीतील नळयोजनेचे काम अर्धवट असून, तेथील उपसरपंचाने सरपंचाच्या पश्चात बोगस सह्या करून योजनेचे पैसे लाटले आहेत,’ असा आरोप उपसभापती डी. आर. पाटील यांनी केला. तसेच घाणबी, वाटोळे, गावडेवाडी, काडोली नळयोजनेत गैरव्यवहार झाला असून, त्याची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी झाली. याबाबत राजाभाऊ शेलार, डी. आर. पाटील यांच्यात खडाजंगी झाली.