कराडला स्टेडियमचे रुप 'पालटणार'; आता राजकीय बाजी 'पलटणार'?
By प्रमोद सुकरे | Published: July 11, 2024 11:40 AM2024-07-11T11:40:35+5:302024-07-11T11:40:48+5:30
निधी स्टेडियमला पण, 'दक्षिण विधानसभे'ची खेळपट्टी मजबूत करण्याची तयारी!
प्रमोद सुकरे
कराड : दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराडला कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्व क्षेत्राचा मोठा वारसा आहे. यातील क्रीडा क्षेत्रातील एक महत्त्वाची वास्तू म्हणजेच येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम होय. नुकतेच या स्टेडियमच्या पुनर्बांधणीसाठी भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून तब्बल ९६.५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे कराडच्या स्टेडियमचे रुप तर 'पालटणार' आहेच पण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची खेळपट्टी मजबूत होऊन तेथील राजकीय बाजी 'पलटणार' का? याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
कराडचे हे स्टेडियम शहर व तालुक्याची शान आहे. येथे यापूर्वी रणजीचे सामनेही झाले आहेत. मात्र अलीकडच्या काही वर्षात या स्टेडियमची दुरावस्था झाली होती. त्याला अनेकदा मलमपट्टी करण्यात आली. पण यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न डॉ. अतुल भोसलेंनी केला असून त्याला निधी उपलब्ध झाल्याने त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे क्रीडाप्रेमी निश्चितच सुखावले आहेत.
नगरपरिषदांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदानातून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी हा निधी मंजूर झाला आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च राज्य शासन उचलणार आहे. या निधी मंजूरचे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे नेते डॉ.अतुल भोसले यांना मुंबईत स्वतःच्या निवासस्थानी बोलावून स्वहस्ते दिले आहे. यावरून फडणवीसांचे डॉ. भोसलेंवरील असलेले प्रेम तर दिसून येतेच. पण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील खेळपट्टी मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्नही स्पष्ट दिसतात.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिणेत प्रथमच भाजपने ६१६ मतांची आघाडी घेत काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला आहे. साहजिकच त्यामुळे येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला असून डॉ.अतुल भोसले यांची पक्षातील पत वाढली आहे. त्याचीच पोहोच पावती म्हणून कराडला हा भरभरून निधी मिळाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता या खेळाच्या मैदानाबरोबरच कराड दक्षिणचे मैदान मारण्याची भाजपची तयारी लपून रहात नाही.
तेव्हा केली होती मागणी..
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने जानेवारी महिन्यात या स्टेडियमवर भव्य कृषी प्रदर्शन आयोजित केले होते. त्याच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. त्यावेळी बोलताना डॉ.अतुल भोसलेंनी येथील स्टेडियम जुने झाले असून त्याच्या पुनर्बांधणीसाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस यांनी 'रणजी'च काय येथे 'आयपीएल'चे सामने होतील असे स्टेडियम बनवू अशी फटकेबाजी करीत भोसलेंना
शब्द दिला होता. त्यानंतर डॉ. भोसलेंनी तातडीने त्याचा आराखडा तयार करून तो सादर केला होता. त्याची दखल घेत फडणवीस आणि निधी देण्याचा शब्द पाळला आहे. त्याचीही तालुक्यात चर्चा आहे.
हे ठरेल राज्यातील तालुकास्तरीय पहिले स्टेडियम
खरंतर तालुकास्तरावर स्टेडियम ची संख्या तशी कमीच दिसेल. पण कराडला मात्र पूर्वीपासून हे भव्य स्टेडियम आहे. आता डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून या स्टेडियमला मोठा निधी उपलब्ध झाल्याने, नव्या स्टेडियम चा आराखडा तज्ञांकडून बनवून घेतल्याने, आंतरराष्ट्रीय सुविधा असणारे राज्यातील तालुकास्तरीय स्टेडियम म्हणून कराडचा उल्लेख होईल असा विश्वास खेळाडू व्यक्त करीत आहेत.
कराडवर भर ..
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कराड शहराचा समावेश होतो. कराड शहर व उपनगरामध्येच मतदार मोठ्या प्रमाणात आहेत.दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शहरातील मतदारांचा निर्णय आजपावतो महत्वपूर्ण ठरत आला आहे. त्यामुळे कराडकरांना आकर्षित करण्यासाठी भाजप नेत्यांचे नेहमीच प्रयत्न सुरू दिसतात. त्याचाच भाग म्हणून हा कराडला निधी उपलब्ध झाल्याचे मानले जाते.