जिल्ह्यातील हॉट स्पॉटमध्ये ९७५ रुग्ण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:12 AM2021-03-04T05:12:00+5:302021-03-04T05:12:00+5:30
सातारा : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे रुग्ण जवळपास अडीच हजार आढळले असून ३४ हॉट स्पॉटमध्ये त्यातील ९७५ आहेत. यामध्ये ...
सातारा : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे रुग्ण जवळपास अडीच हजार आढळले असून ३४ हॉट स्पॉटमध्ये त्यातील ९७५ आहेत. यामध्ये सर्वाधिक २१५ दहिवडीत, तर कोरेगावात ५६ आणि सासुर्वेत ५३ बाधित स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा विस्फोट होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात मागील ११ महिन्यांपासून कोरोनाची स्थिती आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर सतत कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात तर कोरोनाचा कहर होता. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३७ हजारांवर पोहोचला होता. मात्र, ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून बाधितांचे प्रमाण कमी झाले. मागील तीन महिने कोरोना स्थिती नियंत्रणात होती. मात्र, फेब्रुवारीत एकदमच कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्याही वाढली.
जिल्ह्यात फेब्रुवारीत नवीन २ हजार ४९१ बाधित स्पष्ट झाले, तर ३६ जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर कोरोनामुक्त १ हजार ८५५ जणांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा विस्फोट होत असल्याचेच आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आलेले आहे. कारण, जिल्ह्यातील ३४ हॉट स्पॉटमध्ये तब्बल ९७५ रुग्ण आढळलेत.
खटाव तालुक्यातील हॉट स्पॉटमध्ये फेब्रुवारीत १८३ रुग्ण आढळले. यामध्ये वडूजमध्ये सर्वाधिक ४५, मांडवे ४०, कातरखटाव १७, येरळवाडी ११, नेर २०, तर पुसेगावला २२ रुग्ण स्पष्ट झाले. सातारा तालुक्यातही १३० रुग्णांची भर पडली. शहरातील सदरबझारमध्ये ३२, मंगळवार पेठेत २६, खोजेवाडीत २५, तसेच इतर हॉट स्पॉटमध्येही नवीन रुग्ण आढळले. कोरेगाव तालुक्यात १७५ रुग्ण समोर आले. यामध्ये कोरेगाव शहरातच ५६, सासुर्वेत ५३, वाघजाईवाडीत ३२, रहिमतपुरात २२ रुग्णांची नोंद झाली.
माण तालुक्यात तर कोरोना स्थिती विस्फोटक बनू लागली आहे. तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या दहिवडीत एका महिन्यात तब्बल २१५ रुग्ण स्पष्ट झाले, तर पळशीत २६, मार्डीत १७, नरवणेत १२ रुग्ण वाढले. वाई तालुक्यात बावधानला २२ रुग्ण आढळून आले.
खंडाळा तालुक्यातील हॉट स्पॉटमध्ये ८१ रुग्ण समोर आले. यामध्ये लोणंदला ४७, पाडेगाव २०, पिंपरे बुद्रुकला १४ रुग्ण वाढले. जावळीत कावडीला १०, तर कऱ्हाड तालुक्यात घारेवाडीत १३ व मलकापूरला १३ रुग्ण स्पष्ट झाले. त्याचबरोबर फलटण तालुक्यातील कोळकीत १५ रुग्ण समोर आले.
चौकट :
फेब्रुवारीअखेरची आकडेवारी...
जिल्ह्यात फेब्रुवारीअखेर ५८ हजार ९९३ रुग्णांची नोंद झाली, तर ५५ हजार ७१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचबरोबर १ हजार ८५३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
चौकट :
हॉट स्पॉट आरोग्य केंद्रांतर्गत रुग्णवाढ...
जिल्ह्यातील हॉट स्पॉट ठरलेल्या आरोग्य केंद्रांच्या अखत्यारित आढळलेल्या रुग्णांचीही नोंद झालेली आहे. यामध्ये साताऱ्यातील हॉट स्पॉट ठरलेल्या चार आरोग्य केंद्रांतर्गत ३९१ रुग्ण आढळले, तर खटावमध्ये २३६, कोरेगावात २४७, माणमधील हॉट स्पॉटच्या केंद्रांतर्गत ३३४, वाई तालुक्यात ३२, खंडाळा १७३, जावळी ४५, कऱ्हाड ४० आणि फलटण तालुक्यात ३२ रुग्णांची नोंद झाली आहे.
...............................................................