माळरानं हिरवाईने नटणार; बांधावर, जमिनीवर बांबू उगवणार!; पावसाळ्यात सातारा जिल्ह्यात बांबू लागवडीला सुरुवात

By नितीन काळेल | Published: May 17, 2024 07:29 PM2024-05-17T19:29:12+5:302024-05-17T19:29:27+5:30

बांबूचा फायदा काय ?.. जाणून घ्या

A bamboo planting scheme will be implemented on pilot basis in Satara district | माळरानं हिरवाईने नटणार; बांधावर, जमिनीवर बांबू उगवणार!; पावसाळ्यात सातारा जिल्ह्यात बांबू लागवडीला सुरुवात

माळरानं हिरवाईने नटणार; बांधावर, जमिनीवर बांबू उगवणार!; पावसाळ्यात सातारा जिल्ह्यात बांबू लागवडीला सुरुवात

सातारा : सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना हेक्टरी ६ लाख ९० हजारांचे अनुदान मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, कृषी आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत पावसाळ्यात शेतीच्या बांधावर आणि जमिनीवरही ९५२ हेक्टरमध्ये ५ लाख ८५ हजार रोपे लावण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल. त्याचबरोबर बांबूच्या हिरवाईने माळरानही नटणार आहे.

राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून बांबू लागवडीसाठी नवीन योजना आणली आहे. या अंतर्गत सातारा आणि लातूर या दोन जिल्ह्यांची निवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना एक हेक्टरसाठी ६ लाख ९० हजार रुपये अनुदान दिले जात आहे. हे तीन वर्षांसाठी मिळणार आहे. या बांबू लागवडीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. यामध्ये हे झाड लावल्यानंतर ४० वर्षांपर्यंत उत्पन्न देते. यासाठी पाणीही देण्याची गरज नसते, तसेच बांबूपासून अनेक वस्तू बनतात. बांबूला चांगली बाजारपेठही उपलब्ध आहे. त्यामुळे बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ही बांबू लागवड सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांना पैसे देण्याची गरज नाही. आता कृषी आणि सामाजिक वनीकरण विभागानेही बांबू रोपे लागवडीची तयारी केलेली आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर ५ लाख ८५ हजार बांबू रोपे लावण्यात येणार आहेत. शेतीचे बांध आणि जमीन, तसेच माळरानावर ही रोपे लावली जातील. यासाठी १ हजार ३२५ शेतकरी लाभार्थी झालेत.

बांबूचा फायदा काय ?

बांबूपासून विविध वस्तू बनविता येतात, तसेच फर्निचरही तयार केले जाते, तर केंद्र शासनाने कंपन्यांत ७ टक्के बायोमास वापरण्याची सूचना केलेली आहे. त्यामुळे बांबू हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. यातून शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, तसेच एकदा बांबूची लागवड केल्यानंतर ४० वर्षे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार आहे.

अनुदान तीन वर्षे..

  • लागवडपूर्व कामांसाठी - १,७९,२७२ रुपये
  • प्रथम वर्ष संगोपन - २,१४,६५३
  • द्वितीय वर्ष संगोपन - १,४४,२७४
  • तृतीय वर्ष संगोपन - १,५१,८९०


रोपे देण्यासाठी संस्था..

राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोपे देण्यासाठी तीन संस्था तयार करण्यात आलेल्या आहेत. या संस्थेकडून शेतकऱ्यांना बांबूची रोपे मिळत आहेत. यासाठी शासनच कंपन्यांना रोपाचे पैसे देणार आहे. नंतर शेतकऱ्याच्या लाभातून पैसे कमी केले जाणार आहेत.

बांबू लागवड नियोजन

तालुका - गावे - लाभार्थी
सातारा - ८२ - १८१
जावळी - ६३ - १०१
वाई - ६८ - १८७
माण - ६० - १८७
खटाव - ६८ - २०८
खंडाळा - ३० - ७०
फलटण - ७३ - १८२
पाटण - ४८ - ९४
कोरेगाव - ३६ - ६९
कऱ्हाड - ०८ - ३७
महाबळेश्वर - ०१ - ०९

सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागाने पावसाळ्यात बांबू लागवड नियाेजन केलेले आहे. शेतीचे बांध, तसेच माळरानावरही बांबू लागवड करण्यात येईल. यातून शेतकऱ्यांना अर्थप्राप्ती होणार आहे. या पावसाळ्यात जिल्ह्यात ९५२ हेक्टरवर ५ लाख ८५ हजार बांबू रोपे लावण्यात येणार आहेत. - हरिश्चंद्र वाघमोडे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग

Web Title: A bamboo planting scheme will be implemented on pilot basis in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.