गवताच्या गंजीला लागलेल्या आगीत म्हशीचा होरपळून मृत्यू, सातारा जिल्ह्यातील चाफळमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 05:27 PM2022-03-29T17:27:09+5:302022-03-29T17:27:30+5:30
ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत छपरातील इतर जनावरांना सोडल्याने मोठा अनर्थ टळला.
चाफळ : चाफळ विभागातील चव्हाणवाडी येथे शेतातील बांध जाळण्यासाठी लावलेल्या आगीत तेरा गवताच्या गंजी जळून खाक झाल्या. यामध्ये एका म्हशीचा होरपळून मृत्यू झाला. काल, सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चव्हाणवाडी येथे गावातीलच एक महिला शेतात बांध जाळत होती. बांध जाळण्यासाठी लावलेली आग काही क्षणातच शेतात लावलेल्या गवताच्या गंजीला लागली. बघता बघता यात तब्बल १३ गवताच्या गंजींना आग लागली.
याठिकाणी जवळ जनावरांना बांधण्यासाठी एक छपर होते. या छपरालाही आग लागल्याने छपरात बांधलेली एक म्हैस होरपळून मृत्यू पावली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत छपरातील इतर जनावरांना सोडल्याने मोठा अनर्थ टळला. या छपरात दहा जनावरे होती. मात्र या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.