इस्लामपूरच्या व्यावसायिकाला मारहाण करून साताऱ्यात लुटले, साडेतीन लाखांचे दागिने लांबविले

By दत्ता यादव | Published: July 11, 2023 01:59 PM2023-07-11T13:59:54+5:302023-07-11T14:00:08+5:30

प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर 

A business man from Islampur was beaten up and robbed in Satara, jewelry worth three and a half lakhs was stolen | इस्लामपूरच्या व्यावसायिकाला मारहाण करून साताऱ्यात लुटले, साडेतीन लाखांचे दागिने लांबविले

इस्लामपूरच्या व्यावसायिकाला मारहाण करून साताऱ्यात लुटले, साडेतीन लाखांचे दागिने लांबविले

googlenewsNext

सातारा : कामानिमित्त साताऱ्यात आलेल्या सिकंदर जगन्नाथ पवार (वय ४३, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) या व्यावसायिकाला मारहाण करून तिघांनी लुटले. त्यांच्या गळ्यातील सोन्याची पावणेतीन तोळ्यांची चेन, एक तोळ्याची अंगठी, मोबाइल आणि दीड हजारांची रोकड असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. राधिका रस्त्यावर ६ जुलैला घडलेली ही धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी समोर आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इस्लामपूरचे व्यावसायिक सिकंदर पवार हे ६ जुलैला साताऱ्यात कामानिमित्त आले होते. राधिका रस्त्यावरील पंजाब नॅशनल बॅंकेच्या शेजारील कट्ट्यावर ते थांबले होते. त्यावेळी रात्रीचे साडेदहा वाजले होते. अचानक त्या ठिकाणी तीन तरुण आले. त्यातील एका तरुणाने सिकंदर पवार यांच्या तोंडावर लाथ मारली तर दुसऱ्या व्यक्तीने त्यांचे हात पकडले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील २ लाख ३० हजार रुपये किमतीची पावणेतीन तोळ्यांची चेन आणि एक तोळ्याची सोन्याची अंगठी, मोबाइल आणि दीड हजारांची रोकड त्यांच्याकडून काढून घेतली. 

त्यानंतर तिघे चोरटे तेथून पसार झाले. या घटनेनंतर भयभीत झालेले सिकंदर पवार हे इस्लामपूरला निघून गेले. साताऱ्यात घडलेला प्रकार त्यांनी घरातल्यांना आणि नातेवाइकांना सांगितल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा त्यांचा निर्णय झाला. सोमवारी सायंकाळी ते साताऱ्यात आले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात येऊन त्यांनी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, सहायक फाैजदार बागवान हे अधिक तपास करीत आहेत.

सीसीटीव्ही उलगडणार रहस्य

इस्लामपूरचे व्यावसायिक सिकंदर पवार यांना मारहाण करणारे तिघेही चोरटे पंजाब नॅशनल बॅंक परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यामुळे लूटमारीचे रहस्य लवकरच उलगडणार आहे. एकट्या दुकट्या प्रवाशाला अडवून अशा प्रकारे लूटमार केली जात असल्यामुळे अनोळखी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.

Web Title: A business man from Islampur was beaten up and robbed in Satara, jewelry worth three and a half lakhs was stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.