यात्रेसाठी घराला कुलूप, मागे राणीहार, रोकड गायब, पोलिसांकडून गुन्हा उघडकीस
By नितीन काळेल | Published: April 14, 2023 06:43 PM2023-04-14T18:43:44+5:302023-04-14T18:43:51+5:30
या सूचनेनंतर पथकाने चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा यापूर्वी चोरीची तक्रार नोंद असणारी एक महिला अपार्टमेंटमध्ये राहण्यास आल्याचे समजले.
सातारा : यात्रेसाठी घराला कुलूप लावून गेल्यानंतर पाठीमागे सोन्याचा राणीहार आणि १६ हजारांची रोकड चोरून नेण्यात आली. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी काही तासांतच गुन्हा उघडकीस आणला. तसेच याप्रकरणी एका महिलेसह सराफालाही ताब्यात घेतले. ही घटना सातारा शहरात घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १० एप्रिल रोजी सातारा शहरातील रामाचा गाेट येथील एक कुटुंब यात्रेसाठी घराला कुलूप लावून चावी शेजारी ठेवून गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेला सोन्याचा अडीच तोळे वजनाचा राणीहार आणि १६ हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झाला होता.
याबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांना गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली होती. त्यानंतर पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांना सूचना केलेली. या सूचनेनंतर पथकाने चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा यापूर्वी चोरीची तक्रार नोंद असणारी एक महिला अपार्टमेंटमध्ये राहण्यास आल्याचे समजले. त्यामुळे संबंधित महिलेकडे चाैकशी केल्यावर प्रथम चुकीची उत्तरे मिळाली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी काैशल्यपूर्वक परिस्थिती हाताळत संबंधित महिलेकडून चोरीची माहिती मिळवली. त्यावेळी तिने चोरीची कबुली दिली. तसेच सोन्याचा राणीहार गहाण ठेवल्याचेही सांगितले. त्यानंतर पोलिसांनी १६ हजारांची रोकड हस्तगत केली. त्याचबरोबर राणीहारही ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला आणि सराफासही ताब्यात घेत अधिक चाैकशी सुरू केली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये हवालदार लैलेश फडतरे, चंद्रकांत माने, सचिन माने, अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, सचिन पवार, स्वप्नील पवार, माधुरी शिंदे, शुभांगी भोसले, कोमल पवार, तनुजा शेख आदी सहभागी झाले होते.