सावकारांच्या त्रासामुळे व्यापाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; कराडातील घटना

By संजय पाटील | Published: December 28, 2023 10:56 PM2023-12-28T22:56:52+5:302023-12-28T22:57:17+5:30

सात खाजगी सावकारांवर गुन्हा दाखल; अठरा लाखांपोटी 33 लाखांची वसुली

A businessman's suicide attempt due to moneylenders' troubles; Incidents in Karad | सावकारांच्या त्रासामुळे व्यापाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; कराडातील घटना

सावकारांच्या त्रासामुळे व्यापाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; कराडातील घटना

कराड : खाजगी सावकारांकडून घेतलेल्या १८ लाख रुपये कर्जापोटी ३३ लाख रुपयांची रक्कम परत देऊनही सावकारांकडून त्रास दिला जात असल्यामुळे व्यापाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. कराडात घडलेल्या या घटनेप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सात खासगी सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

युगल दिलीप सोळंकी (रा. शनिवार पेठ, कराड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. तर याप्रकरणी शुभम उर्फ सोनू ढेब (रा. शुक्रवार पेठ, कराड), शुभम शांताराम मस्के (रा. खंडागळेवाडा, शुक्रवार पेठ, कराड), ओंकार गायकवाड (बैलबाजार रोड, कराड), निलेश पाडळकर, दादा मस्के (दोघेही रा. सातशहीद चौक, कराड), अथर्व चव्हाण (रा. उंब्रज, ता. कराड), तेजस चव्हाण (रा. आझाद चौक, कराड) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शनिवार पेठेत राहणारे युगल सोळंकी हे व्यापारी आहेत. त्यांना व्यापारासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे त्यांनी जून २०२३ मध्ये शुभम ढेब व शुभम मस्के या दोघांकडून ४ लाख रुपये व्याजाने घेतले. या रकमेपोटी त्यांनी आजअखेर १२ लाख रुपये त्या दोघांना परत केले. मात्र, तरीही मुद्दल बाकी असल्याचे सांगून त्या दोघांकडून युगल सोळंकी यांच्याकडे पैशाची मागणी केली जात होती.

शुभम ढेब व शुभम मस्के या दोघांचा त्रास टाळण्यासाठी सोळंकी यांनी मलकापुरातील ओंकार गायकवाड याच्याकडून ४ लाख ६१ हजार रुपये तसेच निलेश पडळकर याच्याकडून अडीच लाख, अथर्व चव्हाण याच्याकडून ४ लाख रुपये घेतले. या सर्वांना त्यांनी वेळोवेळी पैसे परत केले. एकूण १८ लाख ११ हजार रुपये कर्जापोटी युगल सोळंकी यांनी ३२ लाख ९९ हजार ३०० रुपये संबंधित खाजगी सावकारांना परत केले आहेत. मात्र, तरीही संबंधितांकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होती. तसेच दुकानात येऊन ते सोळंकी यांना धमकावत होते. हा त्रास असह्य झाल्यामुळे युगल सोळंकी मानसिकरित्या खचले. या त्रासातूनच त्यांनी २० डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी संजीवनी मेडिकल सेंटर येथे दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात सात सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read in English

Web Title: A businessman's suicide attempt due to moneylenders' troubles; Incidents in Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस